नागपूर म्हटलं की संत्रानगरी असा उल्लेख आपोआप येतो. संत्र्यासाठी नागपूर जगप्रसिद्ध आहे. तसचं नागपूरची ओळख सर्वाधिक तपमानासाठी ही केली जाते. जिथे उन्हाळ्यात तापमान 47 डिग्रीवर पोहोचते. अशा या नागपूरात जर कश्मिरच्या हवामानातील शेती केली गेली तर? तुम्हाला त्यावर कधीच विश्वास बसणार नाही. पण नागपुरातच चक्क काश्मिरी केसरची थंड हवामानातील शेती केली जात आहे. एका तरुण जोडप्याने राहत्या घरीच एका खोली केसरचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शिवाय त्यातून त्यांना आता लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी घेतली प्रेरणा
अक्षय होले आणि त्यांची पत्नी दिव्या यांनी ही शेती केली आहे. अक्षय हा व्यावसायिक आहे. तर पत्नी दिव्या एक बँकर आहे. दिव्या सांगते की आम्हा दोघांना शेतीची आवड आहे. पण प्रत्यक्ष शेतात न जाता आणि आपल्या व्यस्त जीवनातील जास्त वेळ खर्च न करता शेती करायला मिळावी अशी इच्छा होती. त्यासाठी इंटरनेटवर सर्च करताना इनडोअर केसर शेती बद्दल वाचले. मग आम्ही तीन महिने काश्मीर मध्ये घालवले. तिथे शेतात केसर पीक कसे घेतले जाते, बियाणे इत्यादीं विषयी माहिती जाणून घेतली. केसरचे रोप कांद्याच्या रोपांप्रमाणे दिसते. त्याचाही अभ्यास केला.
ट्रेंडिंग बातमी - DCM एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे कोण? का दिली धमकी?
कसे केले इनडोअर केसर फार्मिंग?
चार- पाच वर्षापूर्वी केसर फार्मिंगला त्यांनी सुरुवात केली. अक्षय सांगतो, की आम्ही ट्रे वर ट्रे रचून वर्टिकल फार्मिंग द्वारे, एरोपोनिक्स प्रणालीद्वारे हे करायचे ठरवले. नागपुरात येऊन काश्मीर सारखे तापमान राखण्यासाठी इन्सुलेटेड खोली तयार करून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात केली. विजेचा पुरवठा सोलर यंत्रणेवरून घेतला. त्यामुळे वारंवार विजेच्या बिलाचा त्रास वाचला. काश्मीर मधून केसर बियाणे आणले होते. शिवाय, एकदा त्याचे बियाणे घेतले तर नंतर विकत घेण्याची गरज भासत नाही. या रोपांतील बियाणे स्वतः मल्टिप्लाय होत राहतं. त्यामुळे तो खर्च देखील शून्यावर आणता येणे शक्य आहे, असं ही त्यांने सांगितलं.
कितपत फायदेशीर आहे हा उद्योग?
अक्षय सांगतो की ज्या व्यवसायात मागणी जास्त आणि पुरवठा कमी तो व्यवसाय केला तर दीर्घ काळ चालतो. या तत्वानुसार केसर फार्मिंगकडे पाहिले पाहिजे. आपल्या देशाला दरवर्षी सुमारे 135 टन केसरची आवश्यकता पडते. पण, आपल्या देशात केवळ दहा पंधरा टन केशरचे उत्पादन होते. ते सुद्धा काश्मिरात तयार होते. आपण केशर आयात करतो आणि त्याची गुणवत्ता देखील फारशी नसते हे पाहिलं होतं. त्यामुळे, या व्यवसायात तुम्ही कितीही उत्पादन केले तरी कमीच आहे, आणि स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती या शेतीत आहे, असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
केसर उत्पादनाचे मार्गदर्शन
सध्या अक्षय आणि दिव्या स्वतःचा केसर व्यवसाय सांभाळून अन्य लोकांना देखील या व्यवसायात येण्याविषयी उत्तेजन देत आहेत. त्याबाबतचे मार्गदर्शनही ते करत आहेत. छोट्यात छोट्या युनिटसाठी आठ ते बारा लाख रुपये खर्च येतो असा त्यांचा अनुभव आहे. इन्सुलेटेड खोली बांधण्यापासून, बियाणे पुरवणे आणि संपूर्ण प्रशिक्षण देणे त्यांनी सुरू आहे, याशिवाय इतरांनी उत्पादन केलेलं केसर स्वतः विकत घेऊन त्याचे मार्केटिंग देखील ते करत आहेत. एक ग्राम ऑरगॅनिक केसर सहाशे तीस रुपयांना आणि अर्धा ग्राम तीनशे पन्नास रुपये असा दर मिळतो आहे. कृषी क्षेत्रातील मेक इन इंडियाचे हे अनोखे उदाहरण म्हणता येईल, कारण केसर आयातीवरील अवलंबन शक्य तितके कमी करून देशाला दर्जेदार केसर पुरवून या क्षेत्रात आत्मनिर्भर, करण्याचा ध्यास या जोडप्याने घेतला आहे.