Raj Thackeray: 'सहद' नाही 'शहाड'च! राज ठाकरेंच्या एका शब्दाने रेल्वेला नमवले, मराठी बाणा पुन्हा चर्चेत

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Raj Thackeray: अंबरनाथहून कल्याणच्या दिशेने परत येत असताना, शहाडजवळ थांबले होते.
कल्याण:

Raj Thackeray News : मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका भूमिकेमुळे शहाड रेल्वे स्टेशनच्या नामफलकावरील हिंदीतील ‘सहद' हा शब्द हटवण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथच्या दौऱ्यावर होते. अंबरनाथहून कल्याणच्या दिशेने परत येत असताना, शहाड रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या स्वागतासाठी मनसेचे काही पदाधिकारी थांबले होते.

याचवेळी राज ठाकरे यांची नजर शहाड रेल्वे स्टेशनच्या मुख्य नामफलकावर पडली. या फलकावर मराठीत 'शहाड' आणि हिंदीत 'सहद' असे लिहिलेले होते. हे पाहताच राज ठाकरे यांनी तातडीने कार्यकर्त्यांना विचारले, "हा काय प्रकार आहे? हिंदीमध्ये हा शब्द कशाला पाहिजे?" कार्यकर्त्यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी कोणताही उशीर न करता कार्यकर्त्यांना तो हिंदी शब्द हटवण्याची सूचना केली.

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )

त्यांच्या सूचनेनुसार, मनसेचे स्थानिक पदाधिकारी बंडू देशमुख यांनी तातडीने शहाड रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांना भेटून निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी हिंदी शब्द हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. मनसेच्या या कठोर भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनावर दबाव वाढला. अखेर, रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत स्टेशनवरील हिंदीतील 'सहद' हा शब्द काढून टाकला. यामुळे, आता स्टेशनवर फक्त मराठीत 'शहाड' असेच लिहिलेले आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेने मराठी पाट्यांच्या जुन्या मुद्द्याला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article