मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात सुरू असलेला एमडी ड्रग्जचा गुप्त उत्पादन कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत आत्तापर्यंत एकूण 192.53 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत सुमारे 390 कोटी रुपये आहे. पोलिसांनी या कारवाईत चार आरोपींना अटक केली आहे.
साकीनाका पोलिसांचे सिक्रेट मिशन
साकीनाका पोलीस ठाण्याच्या अँटी नारकॉटीक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी मैसूर शहर पोलिसांच्या मदतीने एमडीएमए ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर छापेमारी केली. या कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. शनिवारी या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली होती, या छापेमारीमध्ये 192.53 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले ज्याची किंमत 390 कोटी आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
( नक्की वाचा: माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला Live पाहायचे होते! राशप नेत्याचा सनसनाटी आरोप )
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी म्हैसूर पोलिसांच्या समन्वयाने महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी या कारवाईबद्दल माहिती दिली. परमेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की,"हे आपल्या राज्यात घडले आहे. त्यांनी हे ड्रग्ज कुठे कुठे पुरवले? ते किती दिवसांपासून कार्यरत होते? नव्याने सुरू झाले होते का? या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल. हा कारखाना कधीपासून सुरू होता याचीही चौकशी केली जाईल. "
कामणमधून सुरू झालेला तपास मैसूरपर्यंत पोचला
24 एप्रिल 2025 रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. मादक पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीविरोधात हे प्रकरण नोंदवण्यात आले होते. प्राथमिक तपासात पालघरमधील कामण गावातून 4.053 किलो एमडी आणि ड्रग्ज निर्मितीची उपकरणे जप्त करण्यात आली होती, ज्यांची किंमत सुमारे 8.04 कोटी रुपये होती. यात सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.
( नक्की वाचा: झोपेच्या गोळ्यांच्या शोधात गेले 77 लाख रुपये, निवृत्त शिक्षिकेला कसं फसवलं? )
सलीम लंगडाच्या टीपनंतर कारवाई
यानंतर, या सिंडिकेटमधील आणखी एक आरोपी सलीम इम्तियाज शेख उर्फ सलीम लंगडा (वय 45, रा. वांद्रे पश्चिम, मुंबई) याला 25 जुलै रोजी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान सलीमने खुलासा केला की, तो कर्नाटकाच्या म्हैसूरमधून एमडी ड्रग्ज खरेदी करत होता. याच माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तचर माहितीच्या मदतीने म्हैसूर रिंग रोडवरील एका गुप्त फॅक्टरीवर छापा टाकला. म्हैसूरमधील ही एमडी निर्मिती फॅक्टरी एका निळ्या रंगाच्या शेडमध्ये, एका गॅरेजच्या मागे चालवली जात होती. ती अशा प्रकारे लपवण्यात आली होती की बाहेरून कोणालाही याची कल्पना येऊ नये. साकीनाका पोलिसांनी तेथून मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ आणि निर्मिती साहित्य जप्त केले.