वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार ते मालेगाव दरम्यान समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात वर्षीय मुलासह 44 वर्षीय पित्याचा दुर्देवी अंत झाला आहे. या अपघातात आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या बोनेटचा चक्काचूर झाला. समृद्धी महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. साधारण 100 किलोमीटर मार्ग हा वाशिम जिल्ह्यातून जातो. समृद्धी महामार्गाच्या बांधणीमुळे अपघात होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत.
आज दुपारी शेलुबाजार ते मालेगाव दरम्यान झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सोनार कुटुंबीय नवी मुंबईवरून वर्धाकडे जात होते. समृद्धी महामार्गावर नादुरुस्त झालेल्या ट्रक कडेला उभा होता. या ट्रकला सोनार कुटुंबीयांची कार मागून जाऊन धडकली. कारही वेगाने होती. त्यामुळे कार थेट ट्रकच्या मागून आतपर्यंत शिरली. या अपघातात चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
नक्की वाचा - विरोधी पक्षनेता तरीही सर्वात मागच्या रांगेत का बसले राहुल गांधी? संरक्षण मंत्रालयाने सांगितलं...
मृतकांमध्ये चालक पराग सोनार (वय 44) व मुलगा अनुश सोनार (वय 7) यांचा समावेश आहे. तर पराग यांची पत्नी दिपाली सोनार (वय 40) आणि मुलगी रुजुल पराग सोनार (वय 17) जखमी झाले आहे. जखमींना प्रथमोचपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे. ही धडक इतकी भीषण होती की, पराग आणि अनुश यांचे मृतदेह अडकून पडले होते. शेवटी कटरने कारचा पत्रा कापून त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. अग्निशामक दलाला ग्राइंडरने कारचा पत्रा कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढावे लागले.