समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यापासून विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहिला आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरील काही भागात रस्त्याला भेगा पडल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला. अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत समृद्धी महामार्गाबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे (Heavy Rain) शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा मोठा भाग जमिनीत खचला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील कुकांबे ते दळखण या भागातील खर्डी परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील धामणी येथील 653 क्रमांकाच्या पॉईंट जवळील उड्डाण पुलाच्या दोन्हीकडील मोठा भाग मोठ्या प्रमाणात जमिनीत धसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच समृद्धी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या काही भागास तडेदेखील गेले आहे.
नक्की वाचा - सर्वसामान्यांना दिलासा देणारा, 'विकसित भारत' संकल्पनेला बळ देणार अर्थसंकल्प; CM एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला उद्घाटनापूर्वीच जर तडे पडत असतील आणि रस्ता खचत असेल तर या ठिकाणाहून सुरू असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कामाच्या गुणवत्तेसंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. अद्याप उद्घाटन न झालेल्या समृद्धी महामार्गावरील या भागात सध्या वर्दळ कमी असली तरी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही