Sanjay Dutt On Marathi Language : राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला.परंतु,महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या दहीहंडीची सर्वत्र चर्चा रंगलीय. मराठी भाषा शिकण्याचा मुद्यावरून सरनाईक यांची मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मात्र,ठाण्यात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात अभिनेता संजय दत्तने मराठीबाबत आश्चर्यकारक विधान केलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. संजय दत्तने सरनाईकांच्या मराठी भाषेबाबतच्या आदेशाला एकप्रकारे केराची टोपलीच दाखवली.
'पुण्याच्या येरवडा तुरुंगात सहा वर्षे राहूनही आपल्याला मराठी शिकता आली नाही,असं विधान संजय दत्तने केलं.दत्त सरनाईक यांच्या बाजूला स्टेजवर उभा होता. यावेळी त्याने दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या तमाम नागरिकांशी संवाद साधला. या दरम्यान, संजय दत्तने सरनाईक यांच्या 'मराठी'बाबतच्या आदेशाची जाहीरपणे खिल्ली उडवली आणि मराठी भाषेचा वाद पुन्हा उफाळला.
सरनाईक यांनी टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.या तारखेपर्यंत मराठी न शिकल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील,असा इशाराही दिला होता.मात्र, महाराष्ट्रातील हिंदी भाषिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशाला एका वर्षाची स्थगिती दिली.यामुळे सरनाईक आणि त्यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली होती.अशातच दत्तने मराठीबाबत असं विधान करून सरनाईकांची जाहीरपणे खिल्ली उडवली.
दाऊद इब्राहिमच्या टोळीने मुंबईत पाठवलेल्या साठ्यातील बेकायदेशीर एके-47 (AK-47) रायफल बाळगल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष टाडा (TADA) न्यायालयाने संजय दत्तला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.त्याच्यावर टाडाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला केवळ शस्त्र कायद्यानुसार (Arms Act) दोषी ठरवण्यात आले होते.परंतु,सहा वर्षे तुरुंगात घालवली नाहीत,असा दावा दत्तने केला होता.सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा पाच वर्षांपर्यंत कमी केली होती आणि त्याचे पॅरोल,फर्लो व कायदेशीर सवलती लक्षात घेता त्याने चार वर्षांपेक्षा थोडा जास्त कालावधी तुरुंगात घालवला.
"तो दुसरी एक भाषा शिकला, ती म्हणजे धमकीची भाषा"
तुरुंगात अनेक कैदी आणि तुरुंग कर्मचारी मराठी असूनही ते त्याच्याशी हिंदीतच बोलायचे. महाराष्ट्राच्या तुरुंग विभागाचे माजी उपमहानिरीक्षक (DIG) स्वाती साठेंच्या माहितीनुसार,दत्तला तुरुंगात मराठी शिकता आली नाही,पण तो दुसरी एक भाषा शिकला,ती म्हणजे 'धमकीची भाषा'.स्वाती साठे या घटनेच्या साक्षीदार आणि या कथेचा एक भाग होत्या. दत्तच्या तुरुंगवासाच्या आठवणींना उजाळा देत साठे म्हणाल्या की,शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरल्यानंतर दत्तला मोठा धक्का बसला होता.तो तुरुंगातील जीवन स्वीकारत नव्हता. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला जेव्हा पहिल्यांदा तुरुंगात आणण्यात आले,तेव्हा त्याने कैद्यांचा पांढरा गणवेश घालण्यास नकार दिला.
तुरुंगातील वॉर्डनने त्याला कैद्यांचा शर्ट घालण्याची विनंती केली,पण त्याने टाळाटाळ केली आणि त्यांच्यासोबत उद्धटपणे वागला. तुरुंग कर्मचार्यांनी त्याच्या या वागणुकीबाबत स्वाती साठे यांना सांगितलं.त्यावेळी साठे त्या ठिकाणी अधीक्षक होत्या.साठे या शिस्तबद्ध आणि कडक कारवायांबाबत ओळखल्या जात होत्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खतरनाक गँगस्टर्सला अद्दल घडवणे,अशी त्यांची ख्याती होती.त्यांच्यासमोर आल्यावर अट्टल गुन्हेगारांचाही थरकाप उडायचा. दत्तच्या गैरवर्तनाबद्दल माहिती मिळाल्यानंतर साठे संतप्त झाल्या होत्या.त्यानंतर त्यांनी थेट त्याच्या तुरुंगाकडे धाव घेतली आणि हातातील लाठी दाखवून त्याला इशारा दिला. "संजू,तू बातों की जुबान समझेगा या लातों की?”,अशा कठोर शब्दात साठे यांनी दत्तला सुनावलं होतं.
साठे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय दत्त घाबरला आणि त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करू लागला. तो लगेच चेंजिंग रूममध्ये गेला आणि त्याने तुरुंगाचा गणवेश परिधान केला.साठे यांच्या इशाऱ्यानंतर दत्तने तुरुंगात कधीही मस्ती केली नाही.काही दिवसातच दत्तची साठे आणि इतर तुरुंग अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले. पुढे त्याने तुरुंग अधिकाऱ्यांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात मदत केली आणि त्याच्या 'लगे रहो मुन्ना भाई' या चित्रपटातून प्रेरणा घेऊन तुरुंगात रेडिओ स्टेशन (Jail Radio)देखील चालवण्यात आले.