विशाल पाटील, मुंबई
"संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही", असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना दिलं आहे. देशमुख कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. आम्हाला न्याय मिळावा अशी भूमिका देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी या भेटीनंतर म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले होते तेच आता आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राला एक उदाहरण मिळणार आहे की गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही चर्चा केली आहे, या प्रकरणाबाबत आमच्याकडे काही गोष्टी होत्या त्या दाखवल्या आहेत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही न्यायाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे.
वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत धनंजय देशमुख यांनी म्हटलं की, राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री बघतील. नि:पक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. एफआयआर आहे त्याप्रमाणे बोलणे झाले.
कितीही मोठा व्यक्ती असो पण त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणात जेवढ्या FIR झाल्या त्या सगळ्या आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. संबंधित सर्व आरोपींच्या CDR चा तपास व्हावा. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुबियांना आश्वासन देत यामध्ये जो कुणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक शासन होईल. अशी कारवाई करू की पुढे जाऊन एक उदाहरण बनेल, असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी देशमुख यांना दिले.
SIT संदर्भात काय बदल करायला हवेत याबाबतही आम्ही चर्चा केली. गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही. तसेच कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांना SIT मध्ये घेणार, असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.