राहुल कुलकर्णी, पुणे
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला आहे. हत्येचा तपास सुरुवातीला संथ गतीने सुरु होता. मात्र विरोधकांची आक्रमकता आणि जनतेच्या असंतोषानंतर तपासाला वेग आला. त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सुदर्शन घुले, प्रतिक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना अटक झाली आहे. तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना 7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याआधी एनडीटीव्ही मराठीने देशमुख कुटुबीयांशी संवाद साधला. यावेळी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. संतोष देशमुख यांच्या पत्नी, आई आणि मुले त्यांच्या आठवणीने ढसाढसा रडले.
दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची भूमिका- सुप्रिया सुळे
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या मुलीची भावुक करणारी मुलाखत पाहिली. आपल्या वडीलांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना शिक्षा व्हावी ही तिची रास्त मागणी आहे. कायद्याच्या चौकटीत या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होण्याची गरज आहे. याप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची भूमिका आहे, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (राशप) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
तुझ्या बाबांना न्याय नक्की मिळेल- चित्रा वाघ
भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखीव ट्वीट करत म्हटलं की, संतोष देशमुख यांच्या मुलीची मुलाखत पाहिली आणि डोळ्यात पाणी आलं. बाळा…दुर्देवानं तुझे बाबा परत आणता येणार नाही, पण हो तुझ्या बाबांना न्याय नक्की मिळेल. तसा शब्द खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आहे.
या राज्यात गुंडाशाही खपवली जाणार नाही. तसेच बीडमधील गुन्हेगारी संपूर्णतः संपवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल आणि तोवर थांबणार नाही. त्याचबरोबर देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की देशमुख कुटुंबाच्या मागणीनुसार SIT मध्ये त्यांना हवे असलेले अधिकारी समाविष्ट करण्यात येतील.