रेवती हिंगवे, पुणे
राज्यभरातील परिचारकांनी पुकारलेल्या संपामुळे पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयाच्या आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे रुग्णालयातील अनेक महत्त्वाच्या सेवा, विशेषतः नियोजित शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. ससून रुग्णालयाचे एकूण ३६१ कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.
संपाचा थेट परिणाम नियोजित शस्त्रक्रियांवर झाला आहे. दररोज ५० ते ७० शस्त्रक्रिया केल्या जात होत्या, त्या आता कमी होऊन केवळ २० ते २५ पर्यंत आल्या आहेत. गंभीर आणि तातडीच्या शस्त्रक्रिया अजूनही केल्या जात असल्या तरी, इतरांना वाट पाहावी लागत आहे.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना म्हणून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील परिचारिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यामुळे सेवेतील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढता येईल अशी अपेक्षा आहे.
ओपीडी आणि तातडीच्या सेवांवर परिणाम नाही
दिलासादायक बाब म्हणजे, रुग्णालयाच्या ओपीडी सेवांवर संपाचा विशेष परिणाम झालेला नाही. दररोज १७०० ते २००० रुग्णांना ओपीडीमध्ये सेवा दिली जात आहे. तसेच, तातडीच्या (emergency) सेवांवरही कोणताही परिणाम झालेला नाही, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
बाह्यरुग्ण (OPD) आणि आंतररुग्ण (IPD) विभागातील रुग्णांची आकडेवारी (१६ ते २१ जुलै)
- १६ जुलै - १,७६८ (बाह्यरुग्ण), ९८५ (आंतररुग्ण विभाग)
- १७ जुलै - १,४५५ (बाह्यरुग्ण), ९४४ (आंतररुग्ण विभाग)
- १८ जुलै - १,३०९ (बाह्यरुग्ण), ९४६ (आंतररुग्ण विभाग)
- १९ जुलै - ८४० (बाह्यरुग्ण), ८१३ (आंतररुग्ण विभाग)
- २१ जुलै - १,४६८ (बाह्यरुग्ण), ९०३ (आंतररुग्ण विभाग)
या परिस्थितीवर बोलताना ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, यल्लप्पा जाधव म्हणाले, "आमचा ३६१ स्टाफ संपावर आहे. प्लॅन सर्जरी आम्ही पुढे ढकलल्या आहेत. तातडीच्या सर्जरी आम्ही करत आहोत. ओपीडीवर परिणाम झाला नाही, आम्ही रोज १७०० ते २००० हजार रुग्ण सेवा देत आहोत. तातडीच्या सेवेवर परिणाम झाला नाही. रोज ज्या ५० ते ७० सर्जरी करतो होतो, त्या आज २० ते २५ केल्या जात आहेत." या संपामुळे हजारो रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत आहे. परिचारकांच्या मागण्यांवर लवकर तोडगा निघून परिस्थिती पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.