Satara News : ताराच्या मागे तीन दिवाने; सातारा सह्याद्रीच्या जंगलात 'शिलेदाराच्या' एन्ट्रीने वाढली स्पर्धा

विशेष म्हणजे या नव्या वाघाच्या एन्ट्रीने सुभेदार आणि सेनापती यांच्यातील स्पर्धा वाढली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल तपासे, प्रतिनिधी

Satara-Sahyadri Tiger Reserve : सातारा -सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत नव्या नर वाघाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नव्या वाघाच्या एन्ट्रीने सुभेदार आणि सेनापती यांच्यातील स्पर्धा वाढली आहे. हे तिघेही जणं सध्या ताराचा पाठलाग करीत असल्याने मोठी चर्चा आहे. या नव्या वाघाला STR T9 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक गाईड मंडळींनी या वाघाचे ‘शिलेदार' असं नामकरण केलं आहे. या नव्या नोंदीमुळे प्रकल्पातील वाघांची एकूण संख्या आता सातवर पोहोचली आहे.


ताराच्या मागे तीन दिवाने...

गेल्या दोन महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये हा वाघ वारंवार दिसून आला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ वनविभागाच्या कॅमेऱ्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. सध्या हा T9 वाघिण T5 ‘तारा'च्या क्षेत्रात तिच्या मागोमाग फिरताना आढळत आहे. विशेष म्हणजे ताऱ्याच्या क्षेत्रात आधीपासूनच T1 ‘सेनापती' आणि T2 ‘सुभेदार' हे नर वाघ वावरत आहेत. त्यामुळे तारा कोणत्या नराची निवड करते, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement

सध्या प्रकल्पातील वाघांची यादी पुढीलप्रमाणे आहे - T1 सेनापती, T2 सुभेदार, T3 बाजी, T4 चंदा, T5 तारा, T6 हिरकणी आणि T9 शिलेदार.

नव्या वाघाची नोंद कशी झाली?

क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितलं की, नव्या वाघाची नोंद ही सह्याद्रीसाठी अत्यंत आनंदाची बाब असून यामुळे येथील जैवविविधता अधोरेखित होते. वाघांच्या नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेसाठी आणि स्थलांतरासाठी जंगलातील जोडमार्ग (कॉरिडॉर) महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री-कोकण टायगर' SKT 21 या वाघाची हालचाल विशेष लक्षवेधी ठरली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे प्रथम छायाचित्र टिपण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये दाजीपूर परिसरात तो पुन्हा आढळला. यावरून तो टायगर कॉरिडॉरमार्गे उत्तरेकडे सरकल्याचे स्पष्ट झाले. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याची नोंद पुन्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाली आहे. हा तरुण नर योग्य अधिवासाच्या शोधात स्थलांतर करत असल्याचे निरीक्षण वन्यजीव तज्ज्ञांनी नोंदवले आहे. वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी सांगितले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे राधानगरी तसेच तिलारी-दोडामार्ग परिसरातील जंगल कॉरिडॉर वाघांच्या संरक्षण आणि प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. नव्या वाघाच्या आगमनाने या कॉरिडॉरची उपयुक्तता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Topics mentioned in this article