निनाद करमरकर
हल्ली शाळेत विद्यार्थ्यांच्या तोंडून सर्रासपणे शिव्या ऐकायला मिळतात. पण त्यांच्या तोंडातली ही शिवराळ भाषा काढून टाकण्याचे प्रयत्न शाळा आणि पालक करतात. त्यात काहींना यश येतं तर काहींना यश येत नाही. अशा वेळी आता 'शिवी मुक्त शाळा' हे अनोखं अभियान राबवलं जाणार आहे. हे अभियान बदलापुरातल्या सर्व शाळांमध्ये राबवली जाईल. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूरच्या आदर्श शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यशाळेतून या अभियानाला सुरुवात झाली. अलीकडच्या काळात टीव्ही आणि मोबाईलचा वाढता प्रभाव, मुलांकडे पालकांचं होत असलेलं दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिव्या देण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुलं असभ्य वर्तन करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी बदलापुरातल्या सर्व शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवला जाणार आहे.
यासाठी या सर्व शाळांमध्ये कडक नियमावली केली जाणार आहे. मुलांच्या वर्तनावर शिक्षकांचा वॉच असेल. मुलांनी शिवीगाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे हा दंड पालकांना भरावा लागेल. या अभियानामुळे मुलांवर निश्चितच चांगले संस्कार होतील, त्यांच्या भाषेचा दर्जा सुधारेल, एक सुजाण पिढी तयार करण्यासाठी हे अभियान पथदर्शी ठरेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय.
बदलापूरमध्ये झालेल्या काही अप्रिय घटनांमुळे हे शहर चर्चेत राहीले आहे. अशा वेळी ही सकारात्मक आणि तेवढीच चांगली बातमी या शहरातून येत आहे. हे अभियान जरी बदलापूर शहरा पूरता मर्यादीत असले तरी भविष्यात ते संपूर्ण राज्यातही राबवले जाण्याची दाट शक्यता आहे. यातून मुलांनाही शिस्त लागेल. त्यांच्या बोलण्या वागण्यात बदल होतील. शिवाय पालकांना दंड भरावा लागत असल्याने त्यांच्यात धाक ही निर्माण होईल.