Shahad Bridge : बदलापुरमार्गावरील वाहतूक कोंडी डबल होणार; 20 दिवस 'या' पुलावरील वाहतूक बंद

या पुलावरील वाहतूक ३ ते २३ नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan Malshej National Highway : कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलावर डांबरीकरणाचं काम करण्यात येणार असल्याने या पुलावरील वाहतूक ३ ते २३ नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहणार आहे. वाहतूक पोलीस आयुक्तांनी पुलावरील वाहतूक बंदची अधिसूचना काढली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांनी दिली आहे. 

माळशेजहून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या ठाणे ग्रामीण हद्दीत डॅम फाटा मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने बदलापूर रोडने बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढा, पलावा, शीळ, डायघर रोड पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात येतील. मुरबाडकडून शहाडपुलावरुन कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दहागावा फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Business Hub : BKC पेक्षाही भव्य बिझनेस हब उभारणार; ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर मेगा प्लानची तयारी

पर्यायी मार्ग कोणते?

ही वाहने दहा गाव फाटे मार्गे वाहोली, एरंजाड, बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढा, पलावा, शीळ, डायघर रोड, पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात येतील. कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहतूक ही सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने पत्रीपूल, चक्कीनाका, नेवाळी नाका, बदलापूर मार्गे इच्छीत स्थळी जातील. यादरम्यान फक्त आपत्कालीन वाहने (रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस, ऑक्सिजन टँकर इ.) यांनाच प्रवेश असेल. 

Advertisement

कटाई ते बदलापूर मोठी वाहतूक कोंडी

परिणामी बदलापुरला जाताना नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. कटाई रोड ते बदलापूर मार्गावर सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी दुप्पट होणार असल्याने नागरिकांना त्यानुसार प्लानिंग करावं लागणार आहे.