राहुल कांबळे, प्रतिनिधी
Drumsticks And Other Veggies Get Costlier : सहज उपलब्ध, स्वस्त आणि घराघरात नियमित बनवल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा सध्या भाजीपाला बाजारात दुर्मीळ झाल्या आहेत. लहरी हवामान, परतीच्या पावसाचा फटका बसल्याने मुंबई एपीएमसी बाजारात शेवग्याच्या शेंगांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याशिवाय राज्यात थंडीचा जोर वाढल्याने इतर भाज्यांच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.
शेवग्याची किंमत पाहून फुटला घाम...
एरव्ही ४० ते ५० रुपये किलो दराने सहज बाजारात मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगांची घाऊक बाजरात आवक चांगलीच घटली आहे. बुधवारी मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात केवळ ८३ क्विंटलच शेवगा शेंगांची आवक झाल्याने दर गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. सध्या शेंगांचे घाऊक दर १८० ते २८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात एका शेंगेला ३० ते ३५ रुपये असा दर मिळत आहे. गेल्या महिन्यांपर्यंत किरकोळ बाजारात ५ ते १० रुपये एक नग या किमतीला मिळणारी शेवग्याची शेंग अचानक इतकी महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना ऐन हिवाळ्यात घाम फुटला आहे.
महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, तसेच गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू येथून शहरातील ग्राहकांची मागणी भागवण्यासाठी नियमित माल येत असतो. मात्र अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळती झाली, तर अनेक शेंगा काळवंडल्याने विक्रीयोग्य मालाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते नवीन उत्पादन बाजारात यायला किमान एक ते दीड महिना लागणार असल्याने शेंगांचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
शेवगा आरोग्यदायी पर्याय...
थंडीच्या काळात शेवग्याच्या शेंगांना विशेष मागणी असते. सूप, सांबार, रस्सा-भाज्यांसह पानांची भाजीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. क जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पचन सुधारणा आणि शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी आहारतज्त्र शेवगा शेंगांचं नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सर्दी, खोकला, थकवा यापासून बचावासाठी हिवाळ्यात शेंगांना घराघरात ‘आरोग्यदायी पर्याय' म्हणून पसंती मिळते.
मात्र, या हंगामातच शेंगांचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि दर प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील ही भाजी सध्या ‘लक्झरी' ठरत आहे.
याशिवाय दररोजच्या जेवण्यात सेवन केल्या जाणाऱ्या भाज्यांचेही दरही वाढले आहेत. थंडीचा जोर वाढल्याने भाज्यांवर परिणाम झाल्याने चांगल्या प्रतीचा भाजीपाला बाजारात कमी झाल्याने दर वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. बुधवारच्या घाऊक बाजार भावानुसार, फ्लॉवर २०-२६ रुपये किलो, कोबी १४-१८ रुपये किलो, गवार ८०-१२० रुपये किलो, फरसबी ३६-४४ रुपये किलो, तोंडली ५६-६० रुपये किलो, वाल ६०-७० रुपये किलो, वांगी ५०-६० रुपये किलो, भेंडी ७०-७६ रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत. तर जेवणातील अविभाज्य भाग असलेल्या टोमॅटोच्या दरातही मोठी वाढ झाली असून सध्या घाऊक बाजारात टोमॅटो ३६-४२ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर २०-३० टक्क्यांनी वाढले आहेत.
नक्की वाचा - Amravati News: 1500 केळीची झाडे जमीनदोस्त, शेतकऱ्यानेच फिरवला बुलडोझर, अमरावतीच्या बळीराजाची व्यथा
पुढील काळात थंडीचा जोर वाढल्यास भाज्यांचे दर अधिक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
मटारच्या दरात मोठी घसरण
एकीकडे शेवग्याच्या शेंगा महागल्या असल्या तरी हिवाळा सुरू झाल्याने बाजारात मटारची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. बुधवारी एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात एकूण १४६३ क्विंटल मटारची आवक नोंदवली गेली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात घाऊक बाजारात ११० ते १५० रुपये किलोपर्यंत विकले जाणारे मटार सध्या ६० ते ८० रुपये किलोपर्यंत आले आहेत. हिवाळ्यात राज्य आणि परराज्यातून मटारची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.