Shirdi News : साईभक्तांसाठी सर्वात मोठी बातमी! 'या' दिवशी साईबाबा मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद, कारण काय?

शिर्डीतील साईभक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shirdi Saibaba Temple Latest News

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi Saibaba Temple News : शिर्डीतील साईभक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आलाय. सोमवारी 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या अनुषंगाने साईबाबा समाधी मंदिर तसेच संस्थान अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये दर्शन व्यवस्था बंद करण्यात येणार आहे. दुपारी 3.20 ते सायंकाळी 6.48 पर्यत दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे, अशी माहिती साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. शिर्डी साईसंस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाजीराव दराडे यांनी याबाबत माहिती दिलीय. 

भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

सोमवारी दुपारी 3.20 वाजल्यापासून सायंकाळी 6.48 वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे 3 तास 28 मिनिटे खग्रास चंद्रग्रहण राहणार आहे. या संपूर्ण कालावधीत साईबाबा समाधी मंदिर तसेच मंदिर परिसरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शन व्यवस्था पूर्णतः बंद राहणार असून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.खग्रास चंद्रग्रहणानिमित्त पारंपरिक पद्धतीनुसार साईबाबांच्या समाधीवर तुळशीची पाने,दर्भ आणि हरळीची दुर्वा अर्पण करून समाधी झाकण्यात येणार आहे.तसेच ग्रहणकाळात मंदिरातील दहा ते पंधरा पुजारी विशेष पूजा,मंत्रोच्चार,जप व धार्मिक विधी अखंडपणे पार पाडणार असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव दराडे यांनी दिली.

नक्की वाचा >> Devendra Fadnavis : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी फुटणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला 'हा' प्लॅन

ग्रहणकाळ संपल्यानंतर सायंकाळी 7 वाजता यमुना,सरस्वती,गोदावरी,सिंधू,नर्मदा,कावेरी आणि गंगा या सात पवित्र नद्यांच्या जलाने साईबाबांच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर ‘शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती तसेच धुपारती संपन्न होईल. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.यानंतर नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता शेजारती होऊन मंदिर बंद करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी ही माहिती आगाऊ जाहीर करण्यात आली असून बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.