CM Devendra Fadnavis Latest Speech : "महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत",असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हटलं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 3 फेब्रुवारी 2026 रोजी प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने अपघात झाला होता. यासंदर्भातील वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीबाबत फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे. फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा कामकाजानिमित्त सभागृहात बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
फडणवीसांनी म्हटलंय की,भविष्यात पुन्हा कधी अशी दुर्घटना घडू नये, यासाठी अशा पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पद्धतीच्या आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षित उपाय तातडीने करण्यासाठीची रेस्क्यु यंत्रणा,साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या संबंधित कंपन्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून योग्य मार्गदर्शक सूचना ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> US-इस्रायल हल्ल्यानंतर रिकामं झालं इराणचं आकाश, मिनिटांतच गायब झाल्या अनेक फ्लाईट्स, थक्क करणारा व्हिडीओ
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर बसवण्यात आलेली आयटीएमएस ही प्रणाली सध्या कार्यरत आहे.या प्रणालीचा उपयोग करून अशा प्रकारच्या अपघाताच्या प्रसंगी माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचवता येईल आणि ट्रॅफिकचे व्यवस्थापन,नियंत्रण,तसेच डायव्हर्शन सुकर करता येईल. आयटीएमएस चा उपयोग करुन अशा घटनांमध्ये प्रवाशांना तातडीने याबाबतची सूचना देण्यासाठीची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जेणेकरुन प्रत्येक प्रवाशास अशा पद्धतीच्या परिस्थितीचा संदेश तत्काळ देता येईल आणि यासाठीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात येतील,असं फडणवीस म्हणाले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?
या वाहतूक कोंडीच्या कालावधीत 36 तासात वसुल करण्यात आलेला टोल हा संबंधित मालकांना परत देण्याचा निर्णय झाला आहे.तसेच इतर प्रगत देशांमध्ये अशा आपातकालिन परिस्थितीत कोणत्या पद्धतीने तातडीने उपाययोजना राबवण्यात येते, याची पडताळणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world