शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदरा गजानन कीर्तिकर यांनी यापुढे माध्यमांशी संवाद साधू नये असे आदेश पक्षाने दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून कीर्तिकर जी काही विधाने करत आहेत त्यामुळे महायुतीत तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे आणखी तेढ निर्माण होवू नये यासाठी पक्षाने ही भूमीका घेतल्याचे समजत आहे. मात्र पक्षाने दिलेल्या या आदेशाचे पालन कीर्तिकर करतात का हे पहावे लागणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गजानन कीर्तिकर यांनी गेल्या काही दिवसापासून माध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रीयांमुळे त्यांवर माध्यमांबरोबर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेशच त्यांना पक्षाने दिले आहे. कीर्तिकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यांनीही शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. त्याच मतदार संघातून त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. कीर्तिकर यांचा पत्ता कट करून शिंदे गटाने या मतदार संघात रविंद्र वायकर यांना उमेदवारी दिली होती.
हेही वाचा - पश्चिम बंगालबाबत मोदींची मोठी भविष्यवाणी, धक्कादायक निकाल लागणार
अमोल कीर्तिकर जिंकले तर वडील म्हणून आपल्याला आनंद होईल असे वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केले होते. शिवाय शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर जिंकले काय किंवा हरले काय? त्यात माझा दोष काय असा प्रश्नही त्यांनी केला होता. त्यांना जिकवायचे की हरवायचे हे मतदार ठरवेल असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते शिशीर शिंदे यांनी कीर्तिकरांची हाकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर भाजपनेते प्रविण दरेकर यांनी कीर्तिकरांनी अमोल यांना जिंकवण्यासाठी कट रचला होता. असा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना कीर्तिकरांनी मला कट रचता येत नाही ती सवय भाजपची आहे असे म्हटले होते. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष सुटका
यासर्व घडामोडींनंतर गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. लोकसभा निवडणुकी आधी त्यांची पक्षातून हाकालपट्टी होऊ शकते असेही बोलले जात होते. ही चर्चा सुरू असताना कीर्तिकर यांच्यासाठी आनंदराव अडसूळ धावून आले होते. कीर्तिकरांवर कोणतीही कारवाई शिंदे करणार नाहीत. जर कारवाई झाली तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच अडसूळ यांनी दिला होता. या सर्व घडामोडी पाहात तुर्तास तरी कीर्तिकरांवर कोणतीही कठोर कारवाई करण्या ऐवजी यांना माध्यमां बरोबर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे.