शिंदे गटाच्या नेत्यांने घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट, निवडणुकीचं अचूक टायमिंग साधल्याची चर्चा

शिंदेंसेनेत असलेले आणि सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्याशी मात्र म्हात्रे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे वामन म्हात्रे यांनी अचूक टायमिंग साधत या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे काही संकेत दिल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, बदलापूर

बदलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो स्वतः वामन म्हात्रे यांनीच फेसबुकवर टाकले. त्यामुळे या पोस्टमधून म्हात्रे यांनी अचूक टायमिंग साधल्याची चर्चा बदलापुरात रंगली आहे.

'दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त नार्वेकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या, या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली', असं वामन म्हात्रे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या भेटीमुळे बदलापूर शहरात चर्चांना उधाण आलं आहे. कारण बदलापूर शहराचा समावेश असलेल्या मुरबाड मतदारसंघात भाजप उमेदवार किसन कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्यात निवडणुकीपूर्वीच काही तरी बिनसलं असून त्यामुळे यंदा म्हात्रे यांनी असहकार पुकारला आहे. 

तर आधी शिंदेंसेनेत असलेले आणि सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्याशी मात्र म्हात्रे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे वामन म्हात्रे यांनी अचूक टायमिंग साधत या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे काही संकेत दिल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे.

वामन म्हात्रे यांनी दिला होता बंडखोरीचा इशारा

दरम्यान, मुरबाड मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला मिळावा अशी मागणी वामन म्हात्रे आणि सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली होती. मात्र महायुतीने भाजपाच्या किसन कथोरे यांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे नाराज म्हात्रे हे बंडखोरीच्या पवित्र्यात होते. मात्र त्यांनी बंडखोरी केली नाही. 

दुसरीकडे सुभाष पवार यांनी मात्र पक्षांतर करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळं आता म्हात्रे हे महाविकास आघाडीच्या सुभाष पवार यांना अप्रत्यक्षपणे मदत करतील अशी शक्यता बदलापूर मध्ये व्यक्त होत असून ऐन निवडणुकीत म्हात्रेंच्या या भेटीमुळे आगामी काळात फटाके फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.