सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज (विधी महाविद्यालय), शेडूंग येथील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या गैरसोयी,शैक्षणिक व प्रशासकीय अनियमितता तसेच महाविद्यालयाच्या चुकीच्या कामकाजाबाबत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,युवासेना विभागीय सचिव विकास गोगावले आणि लोकसभा संपर्कप्रमुख विश्वजीत बारणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.या प्रकरणी युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शीतल देवरुखकर - शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.अजय भामरे यांची भेट घेतली. तसच विल्फ्रेड महाविद्यालयातील विविध गंभीर बाबींची सविस्तर माहिती देत यासंबंधीत उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रे सादर केली.
महाविद्यालयाकडून निकाल व गुणपत्रिकांबाबत निर्माण झालेला संभ्रम,निकालापूर्वीच पुढील प्रवेश प्रक्रिया राबविणे,विद्यार्थ्यांकडून प्रॉस्पेक्टस (Prospectus) साठी शुल्क आकारूनही ते त्यांना उपलब्ध न करून देणे,शुल्क संरचनेतील तफावत,विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे परत न करणे, परीक्षा उपस्थितीबाबत निर्माण झालेले प्रश्न,विद्यार्थ्यांशी अरेरावीची वागणूक तसेच मूलभूत विद्यार्थी सुविधा व तक्रार निवारण यंत्रणेतील त्रुटी,याबाबत विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
महाविद्यालयीन प्रशासनाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही
युवासेनेच्या शिष्टमंडळाकडून स्पष्ट सांगण्यात आलं की,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणतीही तडजोड किंवा महाविद्यालयीन प्रशासनाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही.विद्यार्थ्यांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,अशी ठाम मागणी करण्यात आली.या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत प्र-कुलगुरू अजय भामरे यांनी संबंधित बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन युवासेनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते,जिल्हा अध्यक्ष रोशन पुजारी,जिल्हा सचिव रोहन ढोले, विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे,महानगर अध्यक्ष प्रेम ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world