सुरज कसबे, प्रतिनिधी
Pimpri Chinchwad News : सर्व सामान्य कुटुंबातील पालकांना आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं स्वप्न हे सत्यात उतरू शकतं हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रावणी टोणगेने (Shravani Tonge) सिद्ध करून दाखवल आहे. अकरावी - बारावीच्या शिक्षणासाठी तिची जर्मनीतील युनायटेड वर्ल्ड कॉलेज संस्थेच्या रॉबर्ट बॉश या कॉलेजमध्ये निवड झाली आहे. श्रावणीच्या आई-बाबांच्या आनंदाला उधाण आलं आहे. लेकीचं कौतुक पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
जर्मनीच्या कॉलेजमध्ये कशी झाली निवड
श्रावणीने यासाठी UWC ची एक शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्यात ती उत्तीर्ण झाली. महाराष्ट्रात 100 टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. श्रावणीची जर्मनीतील रॉबर्ट बॉश या कॉलेजमधील प्रवेश प्रकिया पूर्ण झाली असून ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात सत्रामध्ये तिचा प्रवेश निश्चित झाला आहे.
नक्की वाचा - Nagpur News : ना शाळेची इमारत, ना विद्यार्थी, ना शिक्षक; तरीही 2 वर्षे सुरू होती शाळा, काय आहे भयंकर प्रकार?
पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी चाळीमध्ये राहणाऱ्या श्रावणीचं पहिलीपासून ते दहावीपर्यंतच शिक्षण कासारवाडीतील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजी माध्यमातून झालं. याच काळात तिला UWC संस्थेच्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळाली. या परीक्षेत लेखी परीक्षा, चर्चा आणि मुलाखत असे टप्पे पार करत ती संपूर्ण 100 टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी ठरली.
82 लाखांचा खर्च कॉलेज करणार
महापालिकेच्या शाळेमध्ये दर्जेदार आणि पोषक वातावरण असल्याचे श्रावणीच्या या निवडीतून सिद्ध झाले आहे. श्रावणीने शिक्षकांचे मार्गदर्शन , जिद्द , चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. जर्मनीतील दोन वर्षाच्या अभ्यास क्रमांत श्रावणी इंग्रजी, विज्ञान, जर्मनी, गणित, अर्थशास्र यांसारख्या विषयांचा अभ्यास करणार आहे. भारतीय मूल्यात तिच्या जर्मनीतील शिक्षणाचा खर्च हा 82 लाखांपेक्षा अधिक आहे. हा सर्व खर्च रॉबर्ट बॉश कॉलेज करणार आहे. श्रावणीच्या या यशाचे कौतुक करायचा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह स्वतः तिच्या घरी गेले होते. श्रावणी शुभेच्छा देत त्यांनी जर्मनीमध्ये कसं राहायचं याबाबत सल्ला ही दिला आहे.
नेहमीच महानगरपालिकेच्या शिक्षण पद्धतीला नावं ठेवणाऱ्या समाजाला श्रावणीच्या या यशाने चांगलीच चपराक बसलीय. केवळ पैशाच्या जोरावर नाही तर अभ्यासाच्या जोरावर यश संपादित करत ही परदेशात शिक्षणासाठी जात येत हे उदाहरण श्रावणीने समाजापुढे ठेवलय तिचं अनुकरण शहरातील अन्य विद्यार्थी ही करतील हीच काय ती अपेक्षा आहे.