
Nagpur News : नागपूरच्या शिवण गाव येथील विद्यावर्धिनी शाळेची इमारत आणि शाळेतील विद्यार्थी नसताना दोन वर्षे शाळा चालविण्याचे दाखवून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. नागपूरच्या मिहान कार्गो प्रकल्पामध्ये शाळेची इमारत आणि आजूबाजूची सर्व गावे 2008 सालीच अधिग्रहित झाली होती.
तरी काही वर्षे शाळा दाखवून शिक्षकांच्या पगाराची रक्कम, इमारतीचं भाडं म्हणून कोट्यवधींचा चुना सरकारी तिजोरीला लावण्यात आल्याचा हा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. दशरथ बरडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आता नागपूर ZP अशा सर्व शाळांची तपासणी मोहीम हाती घेत आहे.
या प्रकरणानंतर नागपूर जिल्हा परिषद आता अॅक्शन मोडवर आली आहे. सर्व अनुदानित खाजगी शाळांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा खरोखर आहे की केवळ कागदावर, विद्यार्थी किती, शिक्षक किती हे सर्व येत्या सोमवारपासून पुढील 3 आठवड्यांत आता तपासलं जाणार आहे. विस्तार अधिकाऱ्यांची 13 पथके यासाठी तडकाफडकी तयार करण्यात आली आहेत आणि या तपासणीला कारण देखील तसेच आहे. एका अशा शाळेचं प्रकरण समोर आलंय ज्यात इमारत नसताना, विद्यार्थी नसताना कागदोपत्री शाळा दाखवून शासनाच्या कोट्यवधींची लूट करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Nagpur News : पु. ल. देशपांडेंच्या सूनबाईंनी शोधला घन कचरा व्यवस्थापनाचा उपाय ! नागपूर पॅटर्नची देशभर चर्चा
विद्यावर्धिनी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय नावाची ही शाळा इमारत नसताना आणि विद्यार्थी नसताना कशी अस्तित्वात होती हे एक कोडे आहे. आता या तक्रारीवर 14 वर्षे शांत बसलेल्या नागपूर जिल्हा परिषदेने तडकाफडकी एक तीन सदस्यीय चौकशी समिती बसवली आहे आणि पंधरा दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. मात्र या समितीतील तीन ही सदस्य याच शिक्षण खात्याचे अधिकारी असल्याने कितपत सत्य बाहेर येईल, हा देखील सवाल आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world