स्वानंद पाटील, प्रतिनिधी
आई अन् मुलांचं नातं जगावेगळं असतं. जितका जीव आई आपल्या लेकरांवर लावते, तितकचं प्रेम मुलंही आपल्या आईवर करीत असते. आई नेहमी आपल्या सोबत असावी असं अनेकांना वाटत असतं. मात्र बीड येथे आईचा दुरावा सहन न झाल्यानं तिच्या मुलाचंही निधन झालं आहे. बीडमधील परळी येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आईच्या निधनाने धक्का बसलेल्या मुलावर आईच्या दहाव्याला अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील संत सावता महाराज परिसरात राहणारे बालाजी शिंदे यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय होता. त्यांची आई तारामती शिंदे यांचं 4 सप्टेंबर रोजी पॅरालिसिसमुळे वयाच्या 80 वर्षी निधन झालं. बालाजी शिंदे यांना आईच्या जाण्याचा मोठा धक्का बसला होता.
आईच्या गंगापुजनाचा कार्यक्रम दहा दिवसांनी 13 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. बालाजी याची तयारी करीत होते. या कार्यक्रमाचं स्थळ, वेळ सांगणाऱ्या छापिल मजकुराच्या व्हॉट्सॲप पत्रिकाही त्यांनी नातेवाईक, आप्त-स्वकीय, मित्रमंडळींना पाठवल्या होत्या. गंगापुजनाचा कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागलं. मित्र-परिवाराने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं लक्षात येताच त्यांना लातूरला हलवण्यात आलं. मात्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी बालाजी शिंदे (वय 53) यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
बालाजी शिंदे मुंबईतील गणेशपार येथे ऑटो चालविण्याचा व्यवसाय करीत होते. गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते याच व्यवसायात होते. पहाटे पाच वाजल्यापासून ऑटो स्टार्ट करून ते कामाला सुरुवात करायचे. अगदी ऊन, वारा, थंडीतही ते नित्यनियमाने पाच वाजता रिक्षा सुरू करायचे. मात्र आईच्या मृत्यूच्या दहा दिवसात त्यांचंही निधन झाल्याचं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.