
अमजद खान, प्रतिनिधी
Maharashtra Board Result 2025 : राज्यात नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवलं आहे. कल्याणच्या ओक शाळेत शिकणाऱ्या माही मकरंद देसवंडीकर या विद्यार्थीनीनं दहावीच्या परीक्षेत दुर्मीळ आजारावर मात करत यश मिळवलं आहे. माहीची परीक्षेपूर्वीच प्रकृती खालावली होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिनं ऑक्सिजन सपोर्टच्या मदतीनं पेपर दिले. त्यानंतरही दहावीत 86 टक्के मार्क्स मिळवले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे आजार?
माहीला सिस्टीक फायबर्सिस हा दुर्मीळ आजार आहे. या आजारात श्वास घ्यायला त्रास होताे. पचनशक्ती कमी असते. प्रतिकार शक्ती कमी असते. वातावरणात बदल झाला की रुग्णाला त्रास होतो. गर्दीच्या ठिकाणी जाता येत नाही. इयत्ता नववीच्या वर्गात असताना तिच्या आई वडिलांना तिच्या शिक्षणाची चिंता सतावत होती. त्यामुळे तिच्या पालकांसह तिच्या शाळेने तिला 'होम स्कूल' म्हणजे घरात शिक्षण देण्याचा निर्णय घेतला
यंदा दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार होती. त्यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी माही आजारी पडली. या आजारामुळे दहावीची परीक्षा देता येणार की नाही? हा प्रश्न सर्वांना सतावत होता. तसेच वर्षभरात केलेल्या अभ्यासाची मेहनत आता वाया जाणार याची काळजी माहीला सतावत होता.
( नक्की वाचा : Inspirational Story : तिसऱ्या वर्षी अॅसिड हल्ल्यात डोळे गेले, कैफीनं बारावीच्या परीक्षेत 95.6% मिळवत केलं टॉप )
ऑक्सिजन सपोर्टनं दिली परीक्षा
माहीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ती पेपर देण्यासाठी ऑक्सिजन घेऊन गेली होती. त्या अवस्थेत तिनं सर्व पेपर दिले. आजारी असूनही चांगल्या पद्धतीनं पेपर सोडावले. त्यानंतर दहावीच्या परीक्षेत तिला 86 टक्के मार्क्स मिळाले आहेत.
माहीचे शिक्षक बाळकृष्ण शिंदे यांनी तिचा अभ्यास घेण्यासाठी विशेष मेहनत घेतली. माहीचे वडिल मकरंद हे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. माहिची आई शर्मिला या देखील शिक्षिका आहे. आई आणि शिक्षकांची माहीला अभ्यासाठी चांगलीच मदत झाली. त्याचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचा पाठिंबा देखील तिला चांगला मिळाला. माहीला पुढील शिक्षण विज्ञान शाखेतून घ्यायचे आहे. तिला मेडिकल सायन्स करायचे आहे. आई- वडील जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील शिक्षण घेण्याची इच्छा तिनं व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world