महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त “बहार-ए-उर्दू” महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत. तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हे होणार आहे. हा साहित्य व सांस्कृतिक महोत्सव 6 ते 8 ऑक्टोबर 2025 दरम्यान एस व्ही पी स्टेडिअम डोम, लाला लजपत राय मार्ग, वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात उर्दू साहित्य व संस्कृती प्रदर्शन, देशभरातील नामवंत शायर आणि कवींचे कवी संमेलन व मुशायरा होणार आहे. शिवाय उर्दू भाषेतील साहित्यिकांचा गौरव, पारितोषिक वितरण सोहळा तसेच नाट्य, संगीत आणि विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. तसेच उर्दू साहित्य आणि भाषाविकासावर संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे उर्दू प्रेमींसाठी ही एक परवणी असणार आहे.
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या महोत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात उर्दू साहित्य, कविता, कला आणि संस्कृतीचा विविधांगी आविष्कार रसिकांना अनुभवता येईल, असे आवाहन विभागाने सर्व उर्दूप्रमी नागरिकांना केले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे.