Pune News : पुणे शहरात सध्या मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे कळप सर्रास दिसत आहेत, ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही धोक्याचे वाटू लागले आहे. याच दहशतीचा अनुभव एका लहान चिमुकलीला आला. वढगाव शेरी परिसरात घराच्या अंगणात खेळत असताना मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओतील दृश्यांनुसार, अंगणात खेळत असलेल्या एका लहान मुलीवर कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांनी तिला चावा घेऊन फरफटत नेले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
पाहा VIDEO
सुदैवाने, या मुलीचा जीव वाचवण्यासाठी देवदूताप्रमाणे दोन तरुण धावून आले. घटनेच्या वेळी गाडीवरून जाणाऱ्या या तरुणांनी कुत्र्यांचा हल्ला पाहिला आणि कोणतीही भीती न बाळगता तातडीने मुलीच्या मदतीसाठी धावले. त्यांनी मोठ्या हिमतीने कुत्र्यांना हुसकावून लावले आणि मुलीची सुटका केली. त्यानंतर त्यांनी तिला तिच्या पालकांकडे सुखरूप सोपवले. या तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला.
अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे कळप दिसत असल्याने पालकांनी आपल्या मुलांना एकटे बाहेर खेळायला पाठवायचे की नाही, असा प्रश्ना पालकांना पडला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेला तातडीने या समस्येवर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.