मुंबईच्या माटुंगा येथील डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या 'मॉडेल युनायटेड नेशन्स' (DBIS MUN) परिषदेच्या 5 व्या पर्वाला विद्यार्थी आणि उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 28 आणि 29 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय परिषदेत मुंबईतील तब्बल 24 नामांकित शाळांमधील 200 हून अधिक विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी सध्याच्या जागतिक समस्या आणि भू-राजकीय आव्हानांवर या व्यासपीठावरून सखोल विचारमंथन केले.
स्वरा भास्करची प्रमुख उपस्थिती
या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. दीपप्रज्वलन करून परिषदेचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर स्वराने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाद्वारे मुलांमध्ये स्वतंत्र विचारसरणी विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे तिने नमूद केले. केवळ स्वतःच्या मतांवर ठाम न राहता इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला.
यासोबतच आजूबाजूच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल पूर्णपणे उदासीन असणारा नागरिक किंवा विद्यार्थी सर्वात वाईट असतो, असे परखड मतही तिने मांडले.
परिषदेच्या उद्देशाबद्दल बोलताना शाळेचे संचालक फादर अजॉय फर्नांडिस यांनी सांगितले की, एमयूएन परिषद ही केवळ वादविवाद स्पर्धा नसून जागतिक आव्हानांवर सखोल चर्चा करून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, संशोधन कौशल्य, निर्णयक्षमता आणि वेळेचे नियोजन यासारखी महत्त्वाची मूल्ये रुजण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्याध्यापिका मीना साल्ढाना यांनी व्यक्त केला.
7 विशेष समित्या आणि प्रत्यक्ष कामकाज
या दोन दिवसीय परिषदेमध्ये युएनएचआरसी, डायसेक, एफडब्ल्यूएचओ, इकोफिन, इकोसॉक, युनिसेफ आणि सोशम या 7 विशेष समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामकाज पार पडले. सेक्रेटरी जनरल विहान केनिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीत या संपूर्ण आंतरशालेय उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world