रेवती हिंगवे, पुणे
Pune News : पुणे शहरातील हिंजवडी येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सह्याद्री पार्क कार्यालयाबाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सौरभ मोरे नावाचा एक कर्मचारी 29 जुलैपासून थकीत पगाराच्या मागणीसाठी फूटपाथवर राहत आहे. त्याचे हे आंदोलन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, कारण त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो फूटपाथवर झोपलेला दिसत आहे आणि त्याच्या बाजूला एक हाताने लिहिलेले पत्र आहे.
व्हायरल झालेल्या पत्रात काय?
सौरभ मोरेने त्याच्या पत्रात म्हटले आहे की, तो 29 जुलै रोजी कामावर परतला, तरीही कंपनीच्या सिस्टीममध्ये त्याचा कर्मचारी आयडी इनअॅक्टिव्ह आहे. याशिवाय त्याला पगार मिळालेला नाही. 30 जुलै रोजी झालेल्या बैठकीत त्याचा पगार देण्याचे मान्य करण्यात आले होते, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे.
आपल्या आर्थिक अडचणींविषयी त्याने एचआरला कळवले होते आणि पगार न मिळाल्यास फूटपाथवर राहण्यास भाग पडेल असा इशाराही दिला होता. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याच कारणामुळे त्याने हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे, असे त्याने पत्रात स्पष्ट केले आहे.
कंपनीचे स्पष्टीकरण आणि आयटी संघटनेचा पाठिंबा
या घटनेनंतर फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज (FITE) या संघटनेने सौरभ मोरेला पाठिंबा दिला आहे. पगार थकल्याच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांनी सौरभच्या धाडसाचे कौतुक केले आहे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही कायदेशीर तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, या प्रकरणावर टीसीएस कंपनीनेही अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, "हा एक कर्मचारी कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिल्याचा प्रकार आहे. नियमांनुसार, या कालावधीसाठी पगार थांबवण्यात आला होता. कर्मचारी आता कामावर परतला असून त्याने पुन्हा रुजू होण्याची विनंती केली आहे. आम्ही त्याची तात्पुरती राहण्याची सोय केली आहे. या प्रकरणाचा योग्य आणि सकारात्मक पद्धतीने तोडगा काढण्यासाठी आम्ही त्याला मदत करत आहोत."