भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेपावणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा काही काळासाठी रखडला आहे. पंकजा मुंडे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघणार होत्या. मात्र, उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे त्यांचा प्रवास लांबणीवर पडला आहे.
पंकजा मुंडे हॉटेलमध्येच थांबल्या
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समजताच पंकजा मुंडे यांनी विमानतळावर जाण्याऐवजी हॉटेलमध्येच थांबणे पसंत केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत उड्डाण रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, पक्षाकडून आता दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत आहे.
Helicopter
(नक्की वाचा- Pune News : फक्त दंड नाही तर गाडीच जप्त होणार, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात पुणे पोलीस आक्रमक)
लातूर दौऱ्याचे महत्त्व
पंकजा मुंडे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा होणार आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप मोठ्या ताकतीने उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किनगाव गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ किनगाव येथे आज सकाळी 12 वाजता पंकजा मुंडे यांची प्रचार सभा होणार होती. त्यामुळे दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध होताच त्या निर्धारित प्रवासासाठी लातूरकडे रवाना होतील. या विलंबामुळे त्यांच्या लातूरमधील कार्यक्रमांच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे.