अविनाश पवार, प्रतिनिधी
Manchar Pune Road Accident News : पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना आज रविवारी घडली. या अपघातात दोन शाळकरी मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. ही मुलं टेम्पोच्या खाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. चिराग भोजराज गुजर (12) आणि क्रिश बावर्जी तेली (13) अशी जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत.दोघेही मंचर मार्केट यार्ड परिसरातील रहिवासी आहेत.अपघातानंतर घटनास्थळी मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त झालेल्या उपस्थित जमावाने मालवाहतूक टेम्पो चालकाला मारहाण केली. अविनाश कडलग असं चालकाचं नाव असून तो निरगुडसर येथील रहिवासी आहे.
दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक
अपघाताच्या ठिकाणी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीला दोन्ही मुलांचा श्वास सुरू असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याने तातडीनं जखमी मुलांना मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. जखमी वेळेवर रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांचे प्राण वाचले, असं बोललं जात आहे. परंतु, दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.