Thane News : ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोडवरील खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आज (8 ऑगस्ट 2025) त्यांनी स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांनी खराब रस्त्याचा भाग पूर्णपणे काढून बेस काढून त्यानंतर इथे डब्लूबीएमने ग्राऊटिंग करावे, त्यानंतर त्यावर डांबर टाकून सगळ्यात शेवटी त्यावर मासटिंग करावे असे निर्देश दिले. जेणेकरून बनवलेले रस्ते दर्जेदार तर होतीलच पण अवजड वाहने जाऊन पुन्हा त्यावर खड्डे पडणार नाहीत. त्यासाठी काही दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला असून लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Pune News : चाकण भागातील वाहतूक कोंडी कशी दूर होणार? अजित पवारांनी सांगितला उपाय )
दर पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त करूनही पुन्हा तिथे डागडुजी करण्याची वेळ येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र याठिकाणी आता 60 मीटर रुंदीचा नवीन रस्ता प्रस्तावित असून तो पूर्ण झाल्यावर हा प्रश्न राहणार नाही असे शिंदे यांनी सांगितले. हे काम सुरू करण्यासाठी वन विभाग आणि खाजगी मालकांकडून जमीन अधिग्रहित केली जात असून ते कामही लवकर पूर्ण केले जाईल. मात्र तुर्तास नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी इथे मासटिंगचा वापर करून रस्त्याची डागडुजी करण्यात येत असून, ते करताना इथे साचणारे पाणी साचू नये यासाठी चर देखील बांधण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. जेणेकरून इथे साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होईल आणि तयार केलेला रस्ता सुस्थितीत राहील असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
भविष्यात ठाणे - बोरीवली बोगदा मार्ग, साकेत ते फाऊंटन कोस्टल मार्ग तयार झाल्यानंतर या मार्गावरील ताण नक्की कमी होईल आणि वाहतूक कोंडीमधून नागरिकांना कायमचा दिलासा मिळेल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.