Thane Mayor News: ठाणे महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंगळवारी (3 फेब्रुवारी 2026) शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड झालीय. शर्मिला पिंपळोलकर या ठाण्याच्या 23व्या महापौर ठरल्या आहेत. तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. या निवडीमुळे ठाणे पालिकेतील चार वर्षाची प्रशासकीय राजवट संपुष्टात आलीय. या पदांसाठी इतर कोणीही अर्ज दाखल न केल्याने ही निवडणूक बिनविरोध झालीय.
"महापौर - उपमहापौरांचा कार्यकाळ प्रत्येकी 15 महिन्यांचा"
शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की,"महायुतीतील अंतर्गत महत्त्वाकांक्षा नियंत्रित ठेवण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने आलटून-पालटून पदे स्वीकारण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ प्रत्येकी 15 महिन्यांचा ठेवण्यात आला आहे." ते पुढे म्हणाले की, ही व्यवस्था निवडून आलेल्या सदस्यांना समाधानी ठेवण्यासाठी करण्यात आली आलीय, ज्यामुळे संपूर्ण कार्यकाळात प्रत्येक पदावर चार वेगवेगळ्या नगरसेवकांना सेवा करण्याची संधी मिळेल.
(नक्की वाचा: Kalyan News: कल्याण-डोंबिवलीत महापौर बिनविरोध, पण पहिलीच महासभा 'या' कारणाने गाजली)
शिवसेना (एकनाथ शिंदे) 75, भाजप 28, राष्ट्रवादी (शरद पवार) 12, राष्ट्रवादी (अजित पवार) 9, एमआयएम 5, शिवसेना (उबाठा) 1, अपक्ष 1 असे सभागृहातील पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी 66 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवण्यात आली होती.
(नक्की वाचा: Dombivli: डोंबिवलीत राजकीय संघर्षाला धार; भाजपा कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना अटक)
विरोधी पक्षनेतेपदी कोण असणार?
दुसरीकडे महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दोन पर्यायांचा विचार केला जात आहे. एक म्हणजे पाच सदस्य असलेल्या एआयएमआयएम पक्षासोबत आघाडी करणे किंवा 12 नगरसेवक असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राशप) सोबत जाणे.
दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 14व्या महापौरपदी शिंदेसेनेच्या हर्षाली चौधरी-थविल आणि उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली.