- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिंदे सेनेच्या हर्षली थविल आणि उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले
- खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिले
- महापालिकेत शिंदे सेनेचे महापौर आणि भाजपचे उपमहापौर पदावर विराजमान झाले आहेत
अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिंदे सेनेच्या हर्षली थविल यांची निवड झाली. तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची निवड झाली. दोन्ही निवड ही बिनविरोध झाली आहे. महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी आचल गोयल यांनी यावेळी केली. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे यावेळी आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा विजय महायुतीचा असल्याचं सांगितलं. या विजयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की महापालिकेत महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झालेले आहेत. महापालिकेत नेहमीच महायुतीची सत्ता राहिली आहे. खासदार, आमदार आणि महापौर- उपमहापौर हे महायुतीचे राहिले आहेत. याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना जाते. 100 पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. महायुतीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली विकास कामे सुरु आहेत. भविष्यात देखील विकासाची कामे होती. ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीत लाडक्या बहिणीला महापौर केले गेले असं ही ते म्हणाले.
यावेळी महापौर थवील यांनी सांगितले की, महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविणार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. महापालिकेतील रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर उपमहापौर दामले यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या निवडणूका झाल्या नव्हत्या. प्रशासकीय राजवटीत ज्या काही त्रूटी राहिल्या असतील त्या दूर करण्यात येतील असं ते म्हणाले. महापौर पदाच्या निवडणूकीचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुख्यालयासमोर एकच गर्दी जमली होती.
महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली. ती खऱ्या अर्थाने गाजली. या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, बोलू नका, नाहीतर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांना खूप माज आलाय असं ही ते म्हणाले. महापौर निवडीनंतर भाषण दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पहायला मिळाला. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी जोरदार टोले बाजी केली. त्यांनी ठाकरे गटाचे नेते उमेश बोरगावकर यांना छेडले.
शिवसेना ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. त्यातले तीन तीन नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यावरून तुमचे नगरसेवक सांभाळा. नक्की किती आहेत ते पाहा. निवडून आलात तेव्हा तुमची क्रिकेट टिम होती. आता तुमच्याकडे कबड्डीची टीम शिल्लक काहीली आहे असा टोला लगावला. दरम्यान दुसरीकडे या निवडणुकीसाठी मोहने येथील शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक मागविण्यात आले होते. 3 तास विद्यार्थी महापालिका मुख्यालयासमोरील फूटपाथवर उन्हात ताटकळत ठेवण्यात आले होते. त्यांना अखेरीस शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाश्ता देऊन घरी पाठवले. हा गोष्ट ही यावेळी चर्चीली जात होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world