Sujata Madke Inspirational Story: ठाणे येथील आरटीओ कार्यालयात सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके (वय 29 वर्ष) यांची इस्रो (ISRO) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. आरटीओमधील सध्याच्या नोकरीपेक्षा अधिक उच्च पदाची आणि सन्मानाची नोकरी मिळवल्याबद्दल सुजाता मडके यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सुजाता मडके यांनी यावेळी म्हटलं की, "माझे पालक नेहमीच माझी प्रेरणा होते आणि त्यांनी मला मोठी ध्येये ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. आज मला त्यांच्यासाठी खूप आनंद होत आहे. आपल्या या यशामुळे त्यांनी आपले खाते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव उजळवले आहे."
परिवहन मंत्र्यांकडूनही अभिनंदन
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुजाता मडके यांचे अभिनंदन केले. सरनाईक यांनी ट्वीट करत म्हटलं की, "यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, पण दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि स्वप्नांवर विश्वास असल्यास व्यक्ती अंतराळापर्यंतही भरारी घेऊ शकते."
(नक्की वाचा- Police Bharati 2025: तयारीला लागा! पोलीस दलात 15, 631 पदांची मेगाभरती; कधी- कुठे कराल अर्ज? वाचा डिटेल्स)
"शहापूर तालुक्यातील शिरगाव या छोट्याशा गावातील आणि सध्या ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता रामचंद्र मडके हिने हे सिद्ध करून दाखवले आहे. सुजाताची ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याची बातमी ठाणे जिल्ह्यासाठी आणि आमच्या संपूर्ण परिवहन विभागासाठी अभिमानाची बाब आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि स्वतःच्या अथक परिश्रमांमुळे सुजाताने घेतलेली ही झेप प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. सुजाता मडके आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा", असं ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.
सुजाता मडके यांचा प्रेरणादायी प्रवास
सुजाता मडके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (रायगड) येथून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयआयटी-खरगपूर येथील व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्टमध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2023 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून आरटीओमध्ये रुजू झाल्या.