Thane–Borivali Twin Tunnel : मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे-बोरिवली हा दुहेरी बोगदा (Thane-Borivali Twin Tunnels) प्रकल्पाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. हा बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असेल. मुंबईतील वाहतुकीसाठी गेमचेंजर ठरणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामासाठी आलेल्या टीबीएम मशीनच्या कामाचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या बोगद्यामुळे शहराच्या पूर्व आणि पश्चिम जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई ते ठाण्याच्या प्रवासाचा वेळ बराच कमी होईल. ११.८४ किलोमीटर लांब रस्त्याच्या प्रवासासाठी सद्यास्थितीत ६० ते ९० मिनिटं लागतात, मात्र नव्या दुहेरी बोगद्यामुळे हा वेळ अत्यंत कमी होईल.
२०२८ पर्यंत रस्ता पूर्ण होणार...
ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणार आहे. वनक्षेत्रावर कमीत कमी पर्यावरणीय परिणाम होईल अशा प्रकारे बांधकाम काम केले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. यासाठी या प्रकल्पासाठी अॅडवान्स टनल बोरिंग मशीन लावण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशाचा वेळ वाचून अवघ्या १५ मिनिटांपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. सध्या हा रस्ता २३ किलोमीटर अंतरावर आहे.
ठाण्याहून बोरिवलीला कसं जाणार?
सद्यास्थितीत ठाण्याहून बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर रोडवरुन जावं लागतं. मात्र या रस्त्यावर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी एक ते दीड तास लागतात. यासाठी हा महत्त्वाकांक्षी टनल प्रकल्प नागरिकांना मोठा दिलासादायक ठरणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील हा प्रकल्प एक भाग आहे. यावर मार्च २०२३ पासून काम सुरू झालं होतं आणि २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. एकूण ११.८४ किमी लांबीच्या मार्गापैकी १०.२५ किमीचा भाग दुहेरी बोगद्याचा असेल.
'नायक' पासून खोदकाम होणार सुरू...
बोगद्याच्या खोदकामासाठी नायक नावाच्या मशीनचा वापर केला जाणार आहे. हे मशीन देशातील एकमेव सिंगल शिल्ड हार्ड रॉक TBM (टनल बोरिंग मशीन) आहे. नायकच्या मदतीने खोदकाम लवकरच सुरू होणार आहे. यानंतर अर्जुन नावाची एक मशीन खोदकामाचं पुढील काम करेल.
दोन्ही दुहेरी बोगद्यात एकूण तीन लेन असतील. ज्यामध्ये एक आपत्कालिन लेनचादेखील समावेश असेल. याशिवाय बोगद्यातून बाहेर पडणं सोपं जावं यासाठी प्रत्येक ३०० मीटरच्या अंतरावर क्रॉस-पॅसेज तयार करण्यात येईल. सोबतच सुरक्षेसाठी बोगद्याच्या आत आग विझवण्याची उपकरणं, स्मोक डिटेक्टर आणि एलईडी आधारित सूचना डिस्प्ले लावण्यात येतील. यादरम्यान या रस्त्यांसह कनेक्टर रस्तेही तयार करण्यात येतील. ठाण्याच्या घोडबंदर रोडला पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडलं जाईल. यामुळे या परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.