Thane News :ठाण्यातील पाणी कपात पुढे ढकलली, आता 'या' कालावधीत 48 तास पाणीपुरवठा बंद, पाहा वेळापत्रक

Thane News: ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Thane News: पाणी कपातीच्या वेळापत्रकात प्रशासनानं मोठा बदल केला आहे.
ठाणे:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane News: ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या आठवड्यात मंगळवार आणि बुधवार दरम्यान होणारी पाणी कपात पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट टळणार आहे. मात्र, हा शटडाऊन रद्द करण्यात आला असला तरी तो पूर्णपणे मागे घेतलेला नाही, तर त्याची तारीख बदलण्यात आली आहे.

यंदा अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे समुद्रातील प्रवाह सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागासोबत झालेल्या आढावा बैठकीत आगामी काळात पाणीटंचाई भासू नये म्हणून पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एमआयडीसीच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्र, जांभूळ येथून दर आठवड्याला 48 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Advertisement

शटडाऊनच्या वेळेत बदल

या नियोजनानुसार सुरुवातीला बुधवार 24 जून 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपासून ते गुरुवार 25 जून 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत असा 24 तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि, 26 जून 2026 रोजी मोहरम हा सण असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. 

आता हा शटडाऊन सणाच्या दिवशी न होता, सण संपल्यानंतर म्हणजेच शुक्रवार 26 जून 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपासून ते रविवार 28 जून 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत असा 48 तास राहील.

( नक्की वाचा : सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 लाख पगार अन् मुंबईत राहण्याची जागा; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज, वाचा सर्व माहिती )

या भागांमधील पाणीपुरवठा राहणार बंद

एमआयडीसीने घेतलेल्या या 48 तासांच्या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मिरा भाईंदर महानगरपालिका या मोठ्या शहरांसह टीटीसी औद्योगिक क्षेत्र आणि वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्र यांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना वीकेंडला पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतरही पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच संबंधित महानगरपालिका, ग्रामपंचायती आणि उद्योजकांनी या पाणी कपातीच्या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article