मुंबईचे उपनगर असलेल्या डोंबिवलीची एक खास ओळख आहे. मुंबईचा विस्तार वाढला, जागेच्या किंमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या. त्यावेळी अनेक मुंबईकर डोंबिवलीत स्थिरावले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील मराठी मंडळीही डोंबिवलीत स्थायिक झाली आहेत. हजारो डोंबिवलीकर रोज कामाच्या निमित्तानं लोकलनं मुंबईत प्रवास करतात. त्यामुळे नोकरदार मंडळींचं शहर हे डोंबिवलीचं मुख्य वैशिष्ट्य आहे. डोंबिवलीच्या जवळपासच्या गावांनीही त्यांची वेगळी ओळख जपलीय. या परिसरातील घारिवली या गावाला डॉक्टरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. घारिवलीला हे नाव कसं पडलं ते पाहूया....
कसं पडलं नाव?
घारिवली गावामध्ये प्रिमियर कंपनीचं युनिट होतं. त्यावेळी ही कंपनी आपल्या कामगारांना भरभक्कम पगार देत होती. त्यामुळे या गावात सोन्याचा धूर निघत असे म्हटले जाते. ही कंपनी बंद पडल्यानंतर गावातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अचानक ढासळलेल्या परिस्थितीमुळे मुलांचं शिक्षण बंद होऊ नये, यासाठी कुणी रिक्षा चालवला, तर कुणी भाजीचा व्यवसाय थाटला. मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी पाठवलं. मुलांना घरच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी कठोर परिश्रम करत अभ्यास केला. यशस्वी होण्यासाठी त्यांनी जिद्दीनं कष्ट केले. या कष्टाचं फळ त्यांना मिळालं.
गावाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणार..
आम्ही गावाचे आरोग्य सुधारण्याचे नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे गावातील डॉक्टरांनी सांगितले. घारविली गावाचे नामकरण 'डॉक्टरांचे गाव' असे केल्याने आम्हाला नवी प्रेरणा मिळाली. आमच्या पालकांनी काबाड कष्ट करून आम्हाला डॉक्टर केले असल्याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे रूग्णांना कमीत कमी खर्चात उपचार करू अशा भावना गावातील तरुणांनी व्यक्त केली.