सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वेळी लोकल प्रवाशांची पहिली पसंती एसी लोकल ठरत आहे. त्यामुळे विनातिकीट एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच एसी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यामुळे जे प्रवासी तिकीट किंवा पास काढून प्रवास करत आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी मध्य रेल्वेकडे करण्यात आल्या. त्यानंतर आता मध्य रेल्वे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पायबंद घालण्यासाठी एक भन्नाट आयडिया केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सेवेसाठी जवळपास 1810 लोकलच्या फेऱ्या होतात. त्यावर रोज 33 लाखा पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात. या फेऱ्या पैकी 66 फेऱ्या या एसी लोकलच्या आहेत. एसी लोकममधून सरासरी 78 हजार प्रवाशी दररोज प्रवास करतात. सर्वाधिक लोकल फेऱ्या या सीएसएमटी ते कल्याण दरम्यान चालवल्या जातात. मात्र उकाडा वाढल्याने अनेक जण एसी लोकलला प्राधान्य देत आहेत. यात अनेक जण हे विनातिकीट प्रवास करत असल्याच्या अनेक तक्रारी मध्य रेल्वेला प्राप्त झाल्या आहेत. याला पायबंद घालण्यासाठी मध्य रेल्वेने एसी टास्क फोर्स नियमित तपासणी बरोबर आणखी एक शक्कल लढवली आहे. त्यामुळे या विनातिकीट प्रवाश्यांना पायबंद बसेल.
हेही वाचा - ...आता महाराष्ट्रातले बिबटेही चालले गुजरातला, कारण काय?
एसी लोकलमध्ये जर कोणी विनातिकीट किंवा अवैध पद्धतीने प्रवास करत असेल तर त्याची तक्रार आता थेट प्रवाशीच करू शकतात. त्यांच्यासाठी मध्य रेल्वेने 7208819987 हा वॉट्सअप क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर एसी टास्क फोर्स त्यावर कारवाई करेल. त्याच वेळी कारवाई शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी लोकलमध्ये साध्य वेशातले कर्मचारी येऊन त्यांची तपासणी करतील. एसी प्रमाणेच प्रथम श्रेणी डब्यासाठी याच पद्धतीने उपाय योजना करण्यात आली आहे.