Thane News : धुलिवंदनाचा उत्साह, ठाण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

आज मुंबई-पुण्यासह ठाण्यात मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. यावेळी वाहतुकी पोलीस अलर्टवर होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thane News : आज मुंबई-पुण्यासह ठाण्यात मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. यावेळी वाहतुकी पोलीस अलर्टवर होते. या काळात मोठ्या संख्येने तरुणवर्ग दारू पिऊन गाडी चालवत असल्याच्या तक्रारी येत असतात. दरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळात होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या १ हजार ६८१ जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या नाकाबंदीत १९६ मद्यपी चालक तावडीत सापडले. यासह विनाहेल्मेट ८३६, फ्रंट सीट २२७, विरुद्ध दिशेने येणारे १४ आणि ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे.

नक्की वाचा - Mumbai Video : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ; प्रसिद्ध दालखिचडीमध्ये भयंकर जीव; ग्राहकाने आवाज चढवताच मॅनेजरने..

होळी - धूलिवंदन कालावधीत ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक विभागातील ४५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात केले होते. होळी - धूलिवंदन कालावधीत मद्य प्राशन करून किंवा नशा करून वाहन चालविणार्‍या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागाने केली होती. पाच परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल १९६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर ८३६ विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे, ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ऑटो रिक्षामध्ये फ्रंट सीट घेणाऱ्या २२७ चालकांवर कारवाई केली असुन विरुद्ध दिशेने वाहने दामटविणारे १४ वाहन चालक तावडीत सापडले आहेत. अशा एकुण १६८१ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या धुळवडीचा रंग पोलिसांनी उतरवला.

Topics mentioned in this article