रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbai Pune Traffic Jam Latest Update : मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे वर गॅस टँकर उलटल्याने तब्बल 32 तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. या पार्श्वभूमीवर ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स एक्सपर्ट अशोक दातार यांनी ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. सरकारने धोरणात्मक बदल करण्याची गरज असल्याचं दातार यांनी सांगितलं आहे. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या गॅस टँकरच्या अपघातामुळे प्रवाशांचा खोळंबा उडाला होता. नागरिकांना 32 तासांपेक्षा अधिक काळ ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला.
ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स तज्ज्ञ अशोक दातार नेमकं काय म्हणाले?
या पार्श्वभूमीवर ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स तज्ज्ञ अशोक दातार यांनी सरकारला मोठा सल्ला दिला आहे. राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यात अशा घटनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई–पुणे महामार्गावर एक अतिरिक्त लेन तयार करावी,असं दातार यांनी म्हटलं आहे. तसेच खासगी छोट्या गाड्यांवरील टोल दर वाढवून पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. खासगी वाहन आणि बस यांचा टोल दर समान केल्यास नागरिक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील आणि महामार्गावरील ट्रॅफिक कमी होईल,असंही ते म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> Rohit Shetty Residence Firing: गोळी सुटली आणि बॉलीवूड-अंडरवर्ल्डच्या संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली
30 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा..
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास झाला. जवळपास 30 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी वर्गाचे मोठे हाल झाले होते. पोलिसांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या आणि खाऊ वाटप केलं. ट्रक आणि अवजड वाहनांचे चालक रात्रभर वाहतूक कोंडीत अडकल्याने थकले होते.
नक्की वाचा >> लग्नात 'रहमान डकैत'ची एन्ट्री होताच पाहुण्यांच्या नजरा खिळल्या, 50 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला Video
रस्ता मोकळा होण्याची वाट पाहता पाहता अनेक चालकांनी रस्त्याच्या मधोमधच स्टीयरिंगवर डोकं टेकवून झोप घेतली.आता पोलीस आणि प्रशासन रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत असताना, हे चालक वेळेवर जागे होत नसल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा मार्ग अडकला आहे.या विचित्र परिस्थितीमुळे वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत.