बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेले होते. पण त्यांचा गुन्हा सुरूवातीला दाखल करून घेण्यात आला नाही. तब्बल 12 तासानंतर गुन्हा दाखल केला गेला. या घटनेनंतर बदलापुरात संताप व्यक्त केला जातोय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर पूर्वेला एक नामांकित शाळा आहे. बदलापुरातली सर्वात मोठी शाळा म्हणून याशाळेचे नाव घेतलं जातं. या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात होत्या. त्यावेळी शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हती. त्यावेळी तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं.
ट्रेंडिंग बातमी - '...तर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 3 हजार रुपये देऊ'
याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली. या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही. तक्रार घ्यावी असा कुटुंबीयांचा आग्रह होता. पण पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पिडीत मुलींच्या कुटुंबीयांनी केला आहे.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच एफआयआर नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय. ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.