लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात झाला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणांना आवाहन करत आणखी एक खूश खबर दिली. जर तुम्ही सरकारला आणखी ताकद दिली तर दिड हजाराचे पावणे दोन हजार, पावणे दोन हजाराचे तीन हजारही होतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महायुतीचे सरकार पुन्हा निवडून द्या, त्यानंतर लाडक्या बहीण योजनेतील पैसे वाढवले जातील असचं त्यांनी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाडक्या बहीणीला ही सरकारची ओवाळणी असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ही योजना फेल जावी यासाठी विरोधक प्रयत्न करत होते. कोर्टातही गेले होते. काहींनी पंधराशे रूपये देतात याची टिंगल केली. पण जे सोन्याचा चमचा घेवून जन्माला आले त्यांना पंधराशे रूपयांचे मोल काय समजणार असा सवाल शिंदे यांनी यावेळी केला. या योजने बाबत अपप्रचारही केला गेला. ही योजना बंद होणार असेही सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा जुमला असल्याचेही सांगितले गेले.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
पण काही झाले तरही ही योजना बंद करणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. ठाकरे यांचे नाव न घेत शिंदे यांनी यावेळी टिका केली. अडीच वर्षे त्यांचे सरकार होते. पण त्यांनी काही दिले नाही. त्यांनी मात्र घेण्याचे काम केले. कोविड काळातही भ्रष्टाचार केला. आम्ही देणारे आहोत. ते घेणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक तुम्ही ओळखा. महायुतीला पुन्हा संधी द्या.
लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही आता पंधराशे रूपये देत आहोत. जर तुम्ही पुढच्या काळात सरकारचे हात आणखी मजबूत केले तर याच पंधराशेचे पावणे दोन हजार होतील. पुढे दोन हजार होतील आणि दोन हजाराचे तीन हजार ही होतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी महायुती सरकारचे हात मजबूत करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्ही असे पर्यंत कोणीही ही योजना बंद करू शकत नाही असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही शिंदे यांनी या संवादावेळी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world