जाहिरात

Ulhasnagar Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकायचे अन्..., विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोघांना अटक

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलिसांनी शीतपेयात (कोल्ड्रिंक) गुंगीकारक औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करणाऱ्या आणि त्यांचे दागिने-रोकड लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

Ulhasnagar Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकायचे अन्..., विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोघांना अटक

Ulhasnagar Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीकारक औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करत त्यांची सोनसाखळी व रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन सराईत आरोपींना उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. नितीन सुर्वे आणि सतीश कनगिरी अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

बदलापूरच्या नागरिकाला बनवले होते लक्ष्य

महिन्याभरापूर्वी बदलापूरचे रहिवासी तानाजी बोंद्रे हे उल्हासनगर कॅम्प 4 मधील व्हीनस चौक परिसरात एका कामानिमित्त आले होते. तिथे या दोन अनोळखी आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि विश्वास संपादन करून त्यांना कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. तानाजी बोंद्रे बेशुद्ध पडताच आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि खिशातील रोख रक्कम चोरून पळ काढला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(नक्की वाचा - Ulhasnagar News: लग्नानंतर अचानक समोर आला बुरखा अन् गोमांस; उल्हासनगरच्या हिंदू मुलीचा बिहारमध्ये भयंकर छळ)

आरोपींची कबुली अन् मुद्देमाल जप्त

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर कॅम्प 1 मधील धोबीघाट परिसरात राहणाऱ्या नितीन सुर्वे याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत नितीन सुर्वे याने त्याचा साथीदार सतीश कनगिरी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सखोल चौकशीत आरोपींनी अशा प्रकारे गुंगीकारक औषध वापरून इतरही गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केली आहे.

मुख्य आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

पोलीस तपासात समोर आले आहे की, मुख्य आरोपी नितीन अशोक सुर्वे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबईतील नवघर, मुलुंड तसेच कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने आतापर्यंत अशा पद्धतीने आणखी किती नागरिकांना लुटले आहे, याचा तपास आता विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com