उल्हासनगर पालिकेचा 'दिव्याखाली अंधार'! शहराला नोटीस धाडणाऱ्या महापालिकेचे मुख्यालयच धोकादायक

Ulhasnagar News: उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील 427 इमारती धोकादायक जाहीर केल्या असल्या, तरी खुद्द पालिकेची मुख्य प्रशासकीय इमारतच धोकादायक बनली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan News: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत तब्बल 427 इमारतींना धोकादायक घोषित करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ज्या पालिकेवर संपूर्ण शहराच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्या उल्हासनगर पालिकेची 'मुख्य प्रशासकीय इमारतच' अत्यंत धोकादायक असल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे, मात्र पालिका प्रशासनाला अद्याप योग्य जागा मिळालेली नाही. परिणामी, दररोज या इमारतीत काम करणारे शेकडो कर्मचारी आणि आपल्या कामासाठी येणारे नागरिक आपला जीव मुठीत धरून येथे वावरत आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)

इमारतीला गेले मोठे तडे

दोन वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगर पालिका मुख्यालयाची इमारत धोकादायक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि नवीन इमारतीसाठी निधीची मागणी केली होती. पालिकेने करून घेतलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही मुख्यालयाची ही इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारतीच्या खांबांना आणि स्लॅबला मोठे तडे गेले असून पावसाळ्यात प्लॅस्टर गळण्याच्या घटना घडत आहेत.

350 कोटींचा डीपीआर; 50 कोटींचा निधी मंजूर

पालिकेकडून नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीसाठी पालिकेने 350 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(नक्की वाचा- सिनेमागृहात तुफान राडा! मैत्रिणीसोबत 'स्पायडर-मॅन' सिनेमा पाहायला आलेल्या तरुणाला प्रेक्षकांनी तुडवलं)

मात्र, नवीन इमारत उभी राहेपर्यंत पालिका प्रशासकीय कामकाज नक्की कुठे हलवायचे, यासाठी योग्य पर्यायी इमारत किंवा जागा गेल्या दोन वर्षांत पालिकेला शोधता आलेली नाही. त्यामुळे एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उल्हासनगरकर आणि पालिका कर्मचारी विचारत आहेत.