Ajinkya Rahane News: परदेशी भूमीवर भारतीय संघासाठी अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारा आणि 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून देणारा भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने 30 जुलै रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. मैदानावरील शांत आणि संयमी स्वभावामुळे अत्यंत आदराचे स्थान मिळवणाऱ्या रहाणेच्या निवृत्तीनंतर आता त्याच्या पुढील वाटचालीची चर्चा सुरू झाली आहे. खेळाडू म्हणून मैदानातील प्रवास थांबला असला, तरी BCCI कडून निवृत्त खेळाडूंना दिला जाणारा आर्थिक आधार रहाणेला मिळणार आहे.
रहाणेला दरमहा 70,000 रुपये पेन्शन का मिळणार?
बीसीसीआयने 2022 मध्ये निवृत्त क्रिकेटपटूंच्या पेन्शनच्या रकमेत सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. अजिंक्य रहाणेने भारतासाठी तब्बल 85 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे तो बीसीसीआयच्या सर्वोच्च पेन्शन श्रेणीमध्ये बसतो. यापूर्वी 75 पेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या खेळाडूंना दरमहा 50,000 रुपये पेन्शन मिळत होती. परंतु, चार वर्षांपूर्वी बीसीसीआयने ही रक्कम वाढवून दरमहा 70,000 रुपये केली आहे.
ही पेन्शन योजना बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आली होती. निवृत्तीनंतर खेळाडूंच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेणे ही मंडळाची जबाबदारी असल्याचे गांगुली यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
बीसीसीआय पेन्शनचा 'हा' महत्त्वाचा नियम
अजिंक्य रहाणेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 85 कसोटी, 90 एकदिवसीय (ODI) आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. निवृत्तीनंतर तो नवीन पिढीतील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यास उत्सुक असल्याचे संकेत त्याने दिले आहेत.
मात्र, बीसीसीआयच्या नियमानुसार, रहाणेला ही 70,000 पेन्शन तोपर्यंतच मिळेल, जोपर्यंत तो बीसीसीआयमध्ये किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) कोणतेही अधिकृत पद स्वीकारत नाही. जर रहाणेने भविष्यात बीसीसीआयमध्ये प्रशासक किंवा अधिकृत प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले आणि पगार घेण्यास सुरुवात केली, तर त्याची पेन्शन तात्पुरती स्थगित केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world