- उल्हासनगरमध्ये राजीव गांधी उद्यानात दारू पिण्याच्या घटना घडत असल्याची माहिती महापौरांना मिळाली होती
- महापौर अश्विनी निकम यांनी त्वरित सुरक्षा व स्वच्छतेसाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले
- उद्यान हे नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी विश्रांतीसाठी राखीव जागा आहे
अमजद खान
प्रत्येक शहरात उद्यानासाठी राखीव जागा असते. जेणे करून नागरिकांनी तिथे मोकळा श्वास घेता यावा. या गार्डन्समध्ये लहान मुलांसाठी खेळण्या सोबतच थोरा-मोठ्यांसाठी ही हक्काची जागा असतो. मग कुठे जॉगिंग ट्रॅक, तर कुठे विरंगूळ्याची साधनं या गार्डनमध्ये असतात. वेगवेगळ्या महापालिका या गार्डन्सवर मोठ्या प्रमाणात खर्च ही करतात. पण या गार्डन्सचा खरोखर नागरिकांसाठी वापर होतो का? हा प्रश्न निर्माण करणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. इथं गार्डन्सचा वापर भलत्याच गोष्टीसाठी होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे शहराच्या महापौरां समोरच हे घडले.
उल्हासनगर महापालिकेच्या अश्विनी निकम या महापौर आहेत. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर त्या सतत शहरातल्या वेगवेगळ्या समस्यांचा आढावा घेत आहेत. त्यांच्याकडे शहरातल्या गार्डन्सबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या उद्यानाचा चुकीच्या कामासाठी वापर होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी उल्हासनगरच्या कॅम्प 5 येथील राजीव गांधी उद्यानात अचानक पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्या समोर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
त्यांनी भेट दिलेल्या उद्यानामध्ये नागरिक नाही तर काही गर्दुल्ले बसले होते. ऐवढेच काय तर भर दिवसा ते तिथे दारू पित असल्याचे आढळून आले. महापौर गार्डनमध्ये पोहोचताच तिथे बसलेले ते लोक गोंधळून गेले. कोणी तरी व्हीआयपी व्यक्ती आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी बसले होते त्याच ठिकाणी दारूच्या बाटल्यांसह त्याचं इतर साहित्य ठेवून धूम ठोकली. हे सर्व काही महापौर मॅडमच्या डोळ्यासमोरच होत होतं. त्यांच्या सोबत त्या परिसरात राहाणारे नागरिक ही होते. इथं रोज अशीच स्थिती असते असं त्यांनी यावेळी सांगितलं.
राजीव गांधी उद्यान हे नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण आहे. असे असतानाही अशा प्रकारे उद्यानात दारू पिण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी महापौर अश्विनी निकम यांनी उद्यानातील सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शिवाय अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्यान स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी लवकरच आवश्यक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की मी संपूर्ण शहराची महापौर आहे. त्यामुळे मी कामासाठी बाहेर पडले आहे. अनेक लोक मला वेगवेगळ्या भागातील समस्या सांगतात. त्या सोडवण्यासाठी आपले प्राधान्य असल्याचे यावेळी अश्विनी निकम यांनी सांगितले. ज्या ठिकाणी नागरिकांनी सोयीसुविधा मिळत नाही त्या ठिकाणी त्या कशा मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र ही घटना समोर आल्यानंतर शहरातल्या उद्यानांच्या सुरक्षेचाच प्रश्न उपस्थित झाला आहे.