रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Pune Metro Phase 2 : पुणेकरांसाठी (Pune) एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-2 (Pune Metro Phase-2) ला मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे पुणे शहराचे मेट्रो नेटवर्क 100 किलोमीटरच्या पुढे जाईल, ज्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रकल्प विकासाची नवी दिशा ठरणार आहे.
कसा आहे नवा मार्ग?
फेज-2 मध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या मार्गांना मान्यता मिळाली आहे. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 31.636 किमी असून, यावर एकूण 28 एलिव्हेटेड स्थानके (Elevated Stations) विकसित केली जाणार आहेत.
लाईन 4 (Line 4): हा मार्ग खराडी (Kharadi) – हडपसर (Hadapsar) – स्वारगेट (Swargate) – खडकवासला (Khadakwasla) असा असेल.
लाईन 4A (Line 4A): हा मार्ग नळस्टॉप (Nal Stop) – वॉरजे (Warje) – माणिक बाग (Manik Bagh) यांना जोडेल.
या प्रकल्पाचा अंदाजित खर्च तब्बल 9,857.85 कोटी रुपये आहे. हा निधी केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार आणि बाह्य निधी संस्था (External Funding Agencies) यांच्या संयुक्त योगदानातून उभारला जाईल. प्रकल्पाचा कालावधी 5 वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका! पुणे मेट्रो 3 चा बाणेरपर्यंत विस्तार, वाचा सर्व माहिती )
पुणेकरांचं आयुष्य बदलणार
पुणे मेट्रोचा फेज-२ शहरातील मुख्य भागांना जोडणारा 'गेम चेंजर' ठरणार आहे. खराडी येथील मोठे IT हब, हडपसर येथील औद्योगिक पट्टा आणि महत्त्वाचे स्वारगेट जंक्शन आता सरळ मेट्रो कनेक्टिव्हिटीने जोडले जातील. हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या CMP (Comprehensive Mobility Plan) चा एक महत्त्वाचा भाग आहे.
या नव्या मार्गांमुळे शहरातील सध्याची लाईन 1 आणि लाईन 2 शी जोडणी होणार आहे. यामुळे पुणे शहरात मल्टिमोडल नेटवर्क (Multimodal Network) अधिक सुलभ होईल, म्हणजेच मेट्रो, रेल्वे आणि बससेवा एकमेकांना जोडल्या जातील. भविष्यात या मार्गांचा लोणी काळभोर (Loni Kalbhor) आणि सासवड (Saswad) पर्यंत विस्तार होण्याचीही शक्यता आहे.
( नक्की वाचा : Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'अच्छे दिन'! बदलापूर-कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन, रोजचा त्रास होणार कमी )
वाहतूक कोंडीवर उपाय
पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या फेज-2 मुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूर रोड, मगरीपट्टा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड आणि मुंबई-बेंगळुरू हायवे यांसारख्या अत्यंत व्यस्त मार्गांवरील वाहतूक भार यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होईल.
पुणे मेट्रोमुळे शहराला एक वेगवान, सुरक्षित आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणपूरक (Eco-Friendly) प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांना वेळेची बचत करून आरामदायक प्रवास करता येईल.
प्रवासी संख्येचा मोठा अंदाज
- येत्या काही वर्षांत पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
- 2028 पर्यंत दररोज सुमारे 4.09 लाख प्रवासी प्रवास करतील.
- 2038 मध्ये ही संख्या 7 लाख पर्यंत पोहोचेल.
- 2048 मध्ये दररोज सुमारे 9.63 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील.
- 2058 पर्यंत ही संख्या 11.7 लाख पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
- यापैकी खराडी–खडकवासला या मार्गावर सर्वाधिक प्रवासी वापर अपेक्षित आहे, जो शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा मुख्य दुवा ठरेल.
प्रकल्पाची अंमलबजावणी
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी महामेट्रो (Maha-Metro) करणार आहे. सर्व नागरी (Civil), यांत्रिक (Mechanical), इलेक्ट्रिकल आणि सिस्टिमशी संबंधित कामे महामेट्रोच्या देखरेखीखाली पूर्ण केली जातील. सध्या या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्व्हे (Survey) आणि डिझाइनचे काम वेगाने सुरू आहे.