मनोज सातवी, प्रतिनिधी
Thane Breaking News : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी दिलीय. एका ईमेलद्वारे ही धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शालेय प्रशासनाने तातडीनं मीरा-भाईंदर पोलीस स्टेशनला कळवलं. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेत घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांचं नागरिकांना मोठं आवाहन
धमकीचा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेमुळं नागरिकांनी अजिबात घाबरू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलंय. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पालक आणि नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे.
नक्की वाचा >> हिवाळ्यात तोंडातून धुरासारखी सफेद वाफ बाहेर का पडते? 99 टक्के लोकांना महितच नाही यामागचं कारण
बॉब्मच्या धमकीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
दिल्ली लाल किल्ल्यासमोर झालेल्या कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमुळं देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूललाही बॉम्बने उडवण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. इमेलच्या माध्यमातून शाळेला ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत कसून तपास सुरु केला आहे. विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी भीती बाळगू नये, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.