संजय तिवारी, नागपूर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते जगदगुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांच्याद्वारे लिखित गणिताच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. वैदिक मॅथेमॅटिक्स बेसिक टु ॲडवान्स लेवल 1, 2 अँड 3 आणि वैदिक गणित सूत्र अरिथमॅटिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "वैदिक गणिताविषयी कळले असते तर गणिताची मला भीती वाटली नसती."
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैदिक गणित पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अनुभव सर्वांसमोर सांगितला. "शाळेत असताना मला गणिताची भीती वाटायची. गणिताच्या भीतीपोटी मी अकरावीत इकॉनॉमिक्स घेतलं. मात्र त्यावेळी वैदिक गणित कळले असते तर कदाचित मला गणिताची भीती वाटली नसती", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(नक्की वाचा - Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर कुणाच्या मदतीने तेलंगणात पोहोचला? 5 जणांना नोटीस)
"खगोलीय तथ्यांना आमच्या पूर्वजांनी गणिताद्वारे शोधले. अत्यंत उच्च दर्जाचे गणित असल्याने हे होऊ शकले. आमच्या संस्कृतीत सर्व शास्त्रांचा पाया गणित आहे. इंग्रजांच्या नव्या शिक्षण पद्धतीने अल्जेब्रा आला. ते शिकलो. सनातन संस्कृतीने जगाच्या कल्याणासाठी अखंडित ज्ञान दिले. जग अल्गोरिथमकडे जात आहे. सूक्ष्म ज्ञानाकडे जात आहे. आमचे ज्ञान अल्गोरिथम पेक्षा वेगळे नाही", अस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"पुस्तकाचे प्रकाशन झाले हा खूप चांगला कार्यक्रम झाला. वैदिक गणितासाठी केंद्र सुरू करा, महाराष्ट्र सरकार मदत करेल. सेंटर ऑफ एक्सेलन्स सुरू करू. राज्य आणि केंद्रीय शाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान कसे पोहोचेल ते करण्याचा मी प्रयत्न करेन", असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.
(नक्की वाचा - Shirdi News : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ ठरणार केंद्र बिंदू, नाईट लँडिग विमानसेवा सुरू)
"भारती कृष्ण यांनी जीवनभर आध्यात्मासोबत देश आणि समाजासाठी काम केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील योगदान होते. शंकराचार्य म्हणून अद्भुत कार्य केले आहे. आपल्याकडे शंकराचार्य म्हणून मोठी परंपरा आहे. भारती कृष्ण पहिले संत जे विदेशात गेले आणि भारतीय विद्या, भारतीय गणित विषयावर व्याख्यान दिले. तेथील लोक देखील त्यामुळे विस्मयचकित होते", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.