मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai Virar Rain Update: जून महिना जवळपास पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्याची सुरुवात अत्यंत दमदार आणि मुसळधार पावसाने झाली आहे. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील रस्ते, नाले आणि गटारे ओसंडून वाहत असून अनेक सखल भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी अत्यंत थरारक आणि धोकादायक घटनाही समोर आल्या आहेत.
नाल्याच्या वेगात कार वाहून गेली
वसई पूर्वेकडील राजवली वाघराळ पाडा परिसरात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, येथील गटाराच्या मोठ्या नाळ्यात दोन चारचाकी गाड्या थेट वाहून गेल्या. यापैकी एका व्हॅगनार कारमध्ये चालक आतमध्येच बसलेला होता. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने कार पाण्याच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत वाहत गेली. या दरम्यान पादचाऱ्यांसाठी बांधलेला एक छोटा पूलही या कारच्या धडकेमुळे तुटला. कार नाल्यात वाहत असताना परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, चालकाने कमालीचे प्रसंगावधान बाळगत योग्य वेळी कारमधून बाहेर उडी मारली.
स्थानिकांनीही तातडीने धाव घेत मदत केल्यामुळे या मोठ्या दुर्घटनेत चालकाचा जीव थोडक्यात वाचला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Heavy Rain in Vasai | मुसळधार पाऊस, कार थेट नाल्यात गेली वाहून | NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 1, 2026
वसईत मुसळधार पावसामुळे नाले उसंडून वाहू लागले आहेत. अशातच वसई पूर्वेच्या वाली वाघराळ पाडा येथे एक कार थेट नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, कार नाल्यात वाहत असतानाही चालक… pic.twitter.com/5MQVI4rfQt
नालासोपाऱ्यात रस्त्यांना नदीचे स्वरूप
नालासोपारा आणि विरार भागातही बुधवारी जोरदार पाऊस झाला. नालासोपाऱ्यातील धानीव बाग, सेंट्रल पार्क आणि तुळिंज ब्रिज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. धानीव बाग येथील मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यापूर्वी गटारे आणि नाले योग्य पद्धतीने साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आले आहे.
यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारी अनेक वाहने पाण्यात बंद पडली असून वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विरार पूर्वेकडील डीमार्ट परिसरात आणि रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले आहे.
( नक्की वाचा : Mumbai Dam: मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 7 टक्के पाणीसाठा; 146 वर्षांतील सर्वात कोरड्या जूनचा बसला मोठा फटका )
वाहतूक विस्कळीत आणि नागरिकांचा संताप
या मुसळधार पावसामुळे आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. तुळिंज ब्रिज परिसरात मोठ्या प्रमाणावर जलभराव झाल्यामुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, या परिस्थितीमुळे वसई आणि नालासोपाऱ्यातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाणी निचरा व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेले सर्व दावे प्रत्यक्षात पूर्णपणे अपुरे ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या जलभरावाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करून प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world