यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे जगावर आणखी एका साथीच्या आजाराचं संकट घोंगावत असल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान केंद्र सरकारनेही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे विमानतळावर सतर्कता...
जागतिक आरोग्य संघटनेने इबोला संसर्गाला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर पुणे विमानतळावर सतर्कता वाढवली. पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विशेष आरोग्य तपासणी आणि निगराणी सुरू करण्यात आली आहे. बँकॉक आणि दुबईहून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी केली जात आहे. विमानातच प्रवाशांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. संशयित लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना तातडीने विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च जोखीम असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील नायडू रुग्णालयात पाठवलं जाणार आहे. विमानतळ कर्मचाऱ्यांना पीपीई वापर, इबोला तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसादाचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. स्वतंत्र कक्षात पीपीई किट घातलेल्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. सध्या पुणे विमानतळावर इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे.
इबोला व्हायरल काय आहे?
काही तज्ज्ञांच्या मते, इबोला या गंभीर विषाणू संसर्ग आहे. इबोला सर्वात आधी १९७६ मध्ये आफ्रिकेत समोर आला होता. हा विषाणू वटवाघळांपासून मानवांमध्ये पसरतो आणि संक्रमित शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्कातून संसर्ग होतो. सुरुवातीला रुग्णाला ताप, डोकेदुखी, घशाला खवखव, उलटी आणि जुलाबसारखे लक्षणं दिसतात. गंभीर अवस्थेत रक्तस्त्राव, अवयव बंद पडण्यासारखे परिणाम दिसतात. इबोलाचा मृत्यूदर ५० टक्क्यांपर्यंत असू शकतो.
श्वसनमार्गाच्या विषाणूंप्रमाणे इबोलाचा प्रसार हवेतून होत नाही. तो केवळ संक्रमित शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्कातून पसरतो. याचा इन्क्यूबेशन पीरियड २ ते २१ दिवसांचा असतो. इबोलाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधासाठी कडक संसर्ग नियंत्रण, विलगीकरण आणि संक्रमित लोकांशी संपर्क टाळणे आवश्यक आहे.
इबोलाचा संसर्ग कसा होतो?
इबोलाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या ऊती, रक्त, घाम, लाळ, मूत्र, विष्ठा, उलटी, गर्भजलामध्ये आणि अंगावरचे दूध तसेच वीर्यामध्येही विषाणू आढळतात. यांपैकी कोणतेही शारीरिक द्रव किंवा आजारी व्यक्तीने वापरलेल्या अंथरुण, कपडे, संक्रमित सुया, वैद्यकीय उपकरणे इत्यादींमधून तसेच लैंगिक संबंधातून, मातेकडून अर्भकाला अशा अनेक मार्गांनी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कीटकदंश आणि अन्नपाण्यातून इबोलाचा संसर्ग होत नाही.