Akola News: अकोल्यातील महिला वणवण भटकतायत..संसार-प्रपंचासाठी दीड किमीचा प्रवास, 'या' ठिकाणी भीषण पाणी टंचाई

अकोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Water Scarcity News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News Today : अकोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार,परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना एक ते दीड किलोमीटर अंतरावर जाऊन हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे. विशेषतः महिला,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना उन्हाच्या तीव्र झळांमध्ये पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.काही नागरिकांना बायपास चौक परिसरातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. तर काही जण खासगी व्यक्तीकडून पैसे देऊन पाणी विकत घेत आहेत. 

आठ महिन्यांपासून रस्ता खोदकामाचा फटका

स्थानिकांच्या माहितीनुसार,गेल्या आठ महिन्यांपासून नवीन रस्ता बांधकामासाठी परिसरातील रस्ते खोदण्यात आले आहेत.मात्र काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.रस्ता खोदकामामुळे जुन्या पाणीपुरवठा लाईनवर परिणाम झाल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत संबंधित नगरसेवकांनी तसेच नगरपंचायत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीतील 'या' परिसरात दहशतीचं वातावरण, CCTV फुटेज समोर येताच पोलिसांची टीम हादरली

टँकर व नवीन पाईपलाईनची मागणी

या संपूर्ण प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते सम्राट ढोले यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये तातडीने नवीन पाईपलाईन टाकून कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा किंवा तोपर्यंत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी त्यांनी नगरपंचायत प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान,वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून आता प्रशासन यावर कितपत तातडीने उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा >> Kalyan News: सावधान! शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवास करताय? एक्स्प्रेसमधील प्रवाशासोबत घडलं भयंकर